'माझ्या कार्यकाळात गैरव्यवहार सिद्ध झाला तर मंदिरासमोर फासावर द्या'; आदेश बांदेकरांचे एकनाथ शिंदेंच्या आरोपांना प्रत्युत्तर
10 Jul 2026 93 Views'माझ्या कार्यकाळात गैरव्यवहार सिद्ध झाला तर मंदिरासमोर फासावर द्या'; आदेश बांदेकरांचे एकनाथ शिंदेंच्या आरोपांना प्रत्युत्तर
राम मंदिरातील दानपेटीच्या कथित लुटीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावर टीका करत, त्या काळात सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. या आरोपांवर तत्कालीन सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी सविस्तर प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आदेश बांदेकर यांनी सांगितले की, सध्या ते माऊलींच्या वारीमध्ये सहभागी असल्याने विधानपरिषदेतील संपूर्ण वक्तव्य त्यांनी पाहिलेले नाही. मात्र, त्यांच्या कार्यकाळाबाबत करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपून जवळपास तीन वर्षे झाली आहेत. त्यामुळे त्यानंतर मंदिर ट्रस्टचा कारभार विद्यमान पदाधिकाऱ्यांकडे असून, त्या काळातील सर्व व्यवहारांची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे.
बांदेकर यांनी सांगितले की, साडेतीन ते चार वर्षांपूर्वी सिद्धिविनायक मंदिराच्या कारभारासंदर्भातील हा विषय विधी आणि न्याय विभागासमोरही उपस्थित झाला होता. त्या वेळी आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्रे शासनाला सादर करण्यात आली होती. मंदिरातील कार्यकारी अधिकारी तसेच वित्त अधिकारी हे शासनाकडून नियुक्त केले जात असल्याने आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्णपणे शासकीय नियंत्रणाखाली होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे कोणताही गैरव्यवहार आढळला असेल तर त्याची अधिकृत माहिती सरकारनेच जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी आदेश बांदेकर यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडली. "जर माझ्या कार्यकाळात एक जरी गैरव्यवहार सिद्ध झाला, तर मला त्याच सिद्धिविनायक मंदिरासमोर फासावर द्या," असे आव्हान त्यांनी दिले. कोणत्याही आधाराशिवाय केवळ बातम्यांच्या आधारे आरोप करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी पुरावे असतील तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.
त्यांनी पुढे म्हटले की, गेल्या साडेतीन वर्षांत मंदिर ट्रस्टचा कारभार इतर पदाधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे या काळात कागदपत्रांमध्ये काही फेरफार झाले असतील, तर त्याचीही निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. "जर मी दोषी आढळलो तर माझ्यावरही कठोर कारवाई करा. मात्र कोणतेही ठोस पुरावे नसताना खोटे आरोप करून माझी बदनामी करू नका," असे त्यांनी स्पष्ट केले.
बांदेकर यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या सहा वर्षांच्या कार्यकाळाचा उल्लेख करत सांगितले की, पहिल्या तीन वर्षांत भारतीय जनता पक्षाशी संबंधित सदस्यही ट्रस्टमध्ये त्यांच्यासोबत कार्यरत होते. त्या काळात झालेल्या प्रत्येक बैठकीची नोंद, मंजुरी आणि आर्थिक व्यवहारांची सर्व कागदपत्रे संबंधित विभागाकडे नियमितपणे सादर करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण कारभार पारदर्शक आणि नियमांनुसार झाल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
याशिवाय, त्यांनी सध्याच्या सरकारवरही अप्रत्यक्ष टीका केली. स्वतःच्या कारभारातील कथित गैरव्यवहार झाकण्यासाठी जुन्या प्रकरणांना उजाळा देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी म्हटले. "धूर दिसला म्हणून आग लागली असे गृहीत धरू नका. वस्तुस्थिती तपासा, पुरावे पाहा आणि त्यानंतरच निष्कर्ष काढा," असा सल्लाही त्यांनी दिला.
शेवटी बांदेकर यांनी पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत सांगितले की, त्यांच्या कार्यकाळातील एक जरी वैयक्तिक गैरव्यवहार किंवा स्वतःच्या फायद्यासाठी केलेले एकही व्हाउचर आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. "मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. सर्व व्यवहार पारदर्शकपणे झाले आहेत. चौकशी करा, सत्य समोर येऊ द्या," असे म्हणत त्यांनी "राम कृष्ण हरी" आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषाने आपली प्रतिक्रिया संपवली.
सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले असून, या प्रकरणात सरकार पुढे कोणती भूमिका घेते आणि चौकशीबाबत काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.