पिंपरी-चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली; 14-15 जण अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर
08 Jul 2026 93 Views
पिंपरी-चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली; 14-15 जण अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत पावसाचा मोठा फटका बसत असून, पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोशी कचरा डेपोजवळील एक बहुमजली इमारत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 14 ते 15 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. अद्याप कोणतीही अधिकृत जीवितहानीची माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातही एक दुर्घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे गोंड वस्ती परिसरातील एक घर अचानक कोसळले. या घटनेत घरातील एक चिमुकली ढिगाऱ्याखाली अडकली होती.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि शिवसेना शहरप्रमुख सुमित सावंत यांनी तत्काळ बचावकार्य हाती घेत चिमुकलीला ढिगाऱ्याखालून सुरक्षित बाहेर काढले. तिला सुरुवातीला पाचोरा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अशा दुर्घटनांमध्ये वाढ होत असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.