कर्नाटकमध्ये भीषण रस्ता अपघात; ट्रक-कारच्या समोरासमोर धडकेत 7 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी
09 Jul 2026 93 Viewsकर्नाटकमध्ये भीषण रस्ता अपघात; ट्रक-कारच्या समोरासमोर धडकेत 7 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी
कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील अरबैल घाट परिसरात भरधाव कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात येल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास घडला. कारमध्ये चालकासह एकूण नऊ जण प्रवास करत होते. हे सर्वजण धारवाड येथून धर्मस्थळ आणि चिकमंगळूर परिसरातील धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान कारवरील नियंत्रण सुटल्याने ती विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत गेली. त्याचवेळी अंकोलाच्या दिशेने येणाऱ्या ट्रकशी कारची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथक आणि पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले.
या भीषण अपघातात कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने हुबळी येथील केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात कार अतिवेगाने चालवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. निष्काळजी वाहनचालनामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेल्याने हा भीषण अपघात झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये कार चालक संजय अंगडी (33), बसवराज (48), अभिषेक ईश्वर (28), अक्षय (26), अभिषेक (26) आणि मंजुनाथ चुलकी (32) यांचा समावेश आहे. आणखी एका मृत व्यक्तीची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या प्रकरणी जखमी शिवराज यांच्या तक्रारीवरून येल्लापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अपघाताच्या सर्व पैलूंचा तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धारवाड परिसरात शोककळा पसरली असून, धार्मिक यात्रेसाठी निघालेल्या सात जणांचा झालेला मृत्यू सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.