Ayodhya Ram Mandir Scam | Shegaon संस्थानाकडे कारभार द्यावा? नेमकं प्रकरण काय?
11 Jul 2026 92 ViewsAyodhya Ram Mandir Scam | Shegaon संस्थानाकडे कारभार द्यावा? नेमकं प्रकरण काय?
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगीवरचं मंदिर प्रशासनाती अधिकाऱ्यांनी कोट्यावधींचा डल्ला मारल्याचं सगळ्यात मोठा स्कॅम सध्या देशात चर्चेत आहे. या प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्दा आता बेअब्रु होत असल्याने राम मंदिराचा कारभार शेगाव येथील जगप्रसिद्ध श्री गजानन महाराज संस्थान किंवा भारतीय लष्कराकडे देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.. इतकंच नाही तर यासाठी तेट राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आलीये.. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे.. शेगाव मंदिर संस्थानाचा कारभार नेमका कसा चालतो.. त्यावर इतका विश्वास ठेवण्यामागचं कारण काय.. हे सगलं आपण समजून घेऊयात.
अयोध्येतील श्रीराम मंदिर... लाखो भक्ताचां श्रद्धास्थान मात्र आज हेच पवित्र मंदिर आरोपांच्या, भष्ट्राचारी कारभाराच्या भोवऱ्यात अडकलंय. गेल्या अनेक दिवसांपासून देशात याच मंदिरातील भ्रष्टाचार आणि चोरी प्रकरणावर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. अशातचं आता माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून राम मंदिर तसेच राम मंदिर संस्थानाचा कारभार शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान किंवा भारतीय लष्कराकडे सोपविण्याची मागणी केली आहे. शिवाय या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात मंदिराचा कारभार अधिक पारदर्शक पद्धतीने चालावा, अशी त्यांची भूमिका आहे.
त्यामुळे सावजी यांच्या संपूर्ण पत्रात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे त्यांनी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानाचा आदर्श पुढे केला आहे. त्यामुळे आता अनेकांना प्रश्न पडत आहे की, देशात अनेक मोठी देवस्थाने असताना नेमके शेगाव संस्थानच का? तर... त्यामागील कारण म्हणजे गेल्या अनेक दशकांपासून या संस्थानाने निर्माण केलेली व्यवस्थापनाची वेगळी ओळख.
श्री संत गजानन महाराज २३ फेब्रुवारी १८७८ रोजी शेगाव येथे प्रकट झाले. आणि त्यांच्या प्रकट दिनापासून शेगाव हे एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित होऊ लागले. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविकांची ये-जा असूनही संस्थानने शिस्त, स्वच्छता आणि नियोजन यांचा उत्तम समतोल राखला आहे.
शेगाव संस्थानच्या यशामागे ज्यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते, ते म्हणजे दिवंगत शिवशंकरभाऊ पाटील. संस्थानच्या परंपरेनुसार, वयाच्या अवघ्या अठरा वर्षी श्री संत गजानन महाराजांच्या आज्ञेने त्यांनी सेवाकार्याची जबाबदारी स्वीकारली. पुढे ३१ ऑगस्ट १९६२ रोजी ते संस्थानचे विश्वस्त झाले आणि १९६९ ते १९९० या सलग वीस वर्षांच्या कालावधीत अध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थानाला नवी दिशा दिली. त्यांनी विश्वस्तपदाला केवळ पद न मानता सेवा मानली आणि आयुष्यभर स्वतःला संस्थेच्या कार्यासाठी समर्पित केले.
शिवशंकरभाऊ पाटील यांच्या कार्यकाळात संस्थानने आर्थिक शिस्त, पारदर्शक प्रशासन आणि उत्तरदायित्व यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. संस्थानला भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत असल्या, तरी त्या निधीचा वापर नियोजनबद्ध आणि गरजेनुसार करण्याची कार्यपद्धती त्यांनी विकसित केली. आर्थिक व्यवहारांमध्ये काटेकोरपणा, दैनंदिन हिशोब, निधीचा योग्य विनियोग आणि संस्थेच्या प्रत्येक कामामध्ये उत्तरदायित्व यामुळे संस्थानची विश्वासार्हता अधिक बळकट झाली.
संस्थानाने केवळ धार्मिक कार्यावर भर न देता समाजोपयोगी उपक्रमांचीही मोठी परंपरा निर्माण केली. शिक्षण क्षेत्रात अनेक शाळा, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्था उभारण्यात आल्या. आरोग्य क्षेत्रात विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध सेवा प्रकल्प सुरू करण्यात आले. अन्नदान, विद्यार्थी निवास, समाजकल्याण आणि सेवाभावी उपक्रमांमुळे संस्थानाची ओळख केवळ धार्मिक संस्था म्हणून न राहता लोकसेवेचे केंद्र म्हणूनही निर्माण झाली.
शेगावचा उल्लेख झाला की आनंद सागर या भव्य प्रकल्पाचाही उल्लेख आवर्जून केला जातो. धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाचा संगम असलेला हा प्रकल्प संस्थानच्या नियोजन क्षमतेचे आणि दूरदृष्टीचे उदाहरण मानला जातो. अत्यंत स्वच्छ परिसर, सुबक नियोजन, पर्यावरणपूरक रचना आणि भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आधुनिक सुविधा यामुळे आनंद सागर आज देशातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक बनला आहे.
याशिवाय शेगाव संस्थानने नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ किंवा इतर संकटांच्या काळात मदतकार्यामध्येही सातत्याने सहभाग नोंदवला आहे. कोरोना महामारीच्या काळातही संस्थानने स्थानिक प्रशासनाला सहकार्य करत विविध मदत उपक्रम राबविले. अशा सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमांमुळे संस्थानबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला.
भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधाही संस्थानच्या व्यवस्थापनाची मोठी ताकद मानल्या जातात. दर्शनासाठी सुयोग्य रांग व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षित वातावरण, निवास व्यवस्था, महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शिस्तबद्ध कर्मचारी आणि स्वयंसेवक यामुळे लाखो भाविकांना कोणताही गोंधळ न होता दर्शन घेणे शक्य होते. त्यामुळे अनेक प्रशासकीय अधिकारी, सामाजिक संस्था आणि मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यास करणारे अभ्यासकही शेगावच्या व्यवस्थापनाचा उल्लेख आदर्श मॉडेल म्हणून करतात.
याच कारणांमुळे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी शेगाव संस्थानाचे नाव सुचविले आहे. त्यांच्या मते, शेगाव संस्थानने अनेक दशकांपासून पारदर्शकता, शिस्त, उत्तरदायित्व आणि लोकसेवा यांचा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे राम मंदिरासारख्या राष्ट्रीय श्रद्धास्थानाचे व्यवस्थापनही अशाच अनुभवी संस्थेकडे दिल्यास भाविकांचा विश्वास अधिक दृढ होईल. असं त्यांनी म्हटलं..
याचबरोबर... सुबोध सावजी यांनी पर्याय म्हणून भारतीय लष्कराचाही उल्लेख केला आहे. भारतीय लष्कराची शिस्त, प्रामाणिकता, कार्यक्षमता आणि जबाबदारीची भावना लक्षात घेता मंदिराचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येऊ शकते, असे त्यांचे मत आहे.
दरम्यान... मंदिरातील दानपेटीवर कर्मचारी आणि संबंधितांनी डल्ला मारत भाविकांनी दिलेलं कोट्यावधींचं दान पळवलं.. इतकंच नाही तर सोनं चांदी यांचाही यात समावेश होता.. या प्रकरणात आतापर्यंत आठ लोकांना ताब्यात घेण्यात आलं असुन, या भामट्यांनी अवघ्या काही महिन्यातचं आलिशान घरं आणि गाड्या खरेदी केल्याचं SIT ने तपासात म्हलं आहे.. आणि दररोज मंदिरातून ६ ते ७ लाख चोरी होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे २०२५ मधील महाकुंभ काळात १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. दररोज १० ते १२ लाख लोक दर्शनाला येत होते. या प्रचंड गर्दीमुळे दान मोजण्यासाठी एका खाजगी एजन्सीमार्फत ४० ते ४५ नवीन कर्मचारी ठेवण्यात आले, ज्यांची शिफारस ट्रस्टच्याच काही सदस्यांनी केली होती. याच काळात सर्वाधिक चोरी झाल्याचा संशय आहे. आधी मंदिरात रोज १६ ते १८ लाख रुपये बँकेत जमा व्हायचे, पण चोरी पकडली गेल्यावर हा आकडा रोज २४ ते २६ लाखांवर पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकरणाला गांभीर्यांने घेऊनंच तपास व्हावा अशी मागणी भाविक सुद्धा करत आहे..
दरम्यान, सुबोध सावजी यांनी पत्रामध्ये अयोध्येतील आर्थिक गैरव्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. तसेच मंदिरातील चोरीच्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशीही त्यांनी पत्रात नमुद केल्य.. त्यामुळे आता या पत्रावर राष्ट्रपती, केंद्र सरकार किंवा श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट कोणती भूमिका घेतात, तसेच सुबोध सावजी यांच्या मागणीवर पुढे कोणती अधिकृत कार्यवाही होते का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.