BJP- NDA सोबत Shivsena ची ताकद वाढत आहे! विरोधक संपणार?

09 Jul 2026    91 Views

BJP- NDA सोबत Shivsena ची ताकद वाढत आहे! विरोधक संपणार?

लहानपणी आपण एक गोष्ट ऐकायचो... एक राजा हळूहळू एक-एक राज्य जिंकत संपूर्ण जगावर राज्य करण्याचं स्वप्न पाहतो. ती फक्त गोष्ट होती... पण आजच्या देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारणाकडे पाहिलं, तर ती गोष्ट वास्तवात उतरत आहे की काय, असा प्रश्न पडतो. भाजप आणि एनडीएची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसतेय, तर विरोधकांची संख्या मात्र सतत कमी होत चालली आहे. काही वर्षांपूर्वी 'विरोधकच उरणार नाहीत' अशी जी चर्चा होती, ती आता खरंच प्रत्यक्षात उतरत आहे का? हा फक्त राजकीय प्रश्न नाही, तर लोकशाहीच्या भविष्यासंदर्भातही एक मोठी चिंता आहे. सध्या देशभरात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहिल्या, तर एनडीएला संसदेत अपेक्षित असलेला आकडा गाठण्याची वाट अधिक सोपी होताना दिसते आहे. आणि महाराष्ट्रातही शिंदेंची शिवसेना केवळ स्वतःची ताकद वाढवत नाही, तर महायुतीलाही अधिक बळकट करताना दिसत आहे. नेमकं हे राजकारण काय आहे? विरोधक इतके का कमकुवत होत आहेत? आणि पुढे नेमकं काय घडू शकतं? याच विषयावर सविस्तर बोलूया.

सुरुवातीला आपण देशपातळीवर बोलुयात मग महाराष्ट्रबद्दल बोलुयात...
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा 303 वरून 240 वर आल्या. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी इतर मित्रपक्षांच्या मदतीची गरज भासली. अशा प्रकारे एनडीए सरकार सत्तेत आलं. एप्रिल 2026 मध्ये महिलांच्या आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यात आलं होतं. मात्र या विधेयकाला आवश्यक तेवढं बहुमत मिळालं नाही. सरकारला 298 मतांचा पाठिंबा मिळाला, तर विरोधात 230 मते पडली. त्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. याच पार्श्वभूमीवर आता भाजप संसदेतील आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याच दिसून आलं..


सर्वात मोठी घडामोड पश्चिम बंगालमध्ये घडली. आणि एनडीए सरकारला पाठिंबा जाहीर केला. दुसरी मोठी घडामोड महाराष्ट्रात घडली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा लोकसभा खासदार बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले. त्यामुळे महाराष्ट्रातही महायुतीची ताकद वाढली.
या दोन्ही घटनांनंतर लोकसभेतील एनडीएची संख्या वाढली आहे. आधीच एनडीएकडे 293 खासदारांचा पाठिंबा होता. त्यानंतर झालेल्या राजकीय बदलांमुळे ही संख्या सुमारे 318 ते 319 पर्यंत पोहोचली. परिस्थितीत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या संख्येनुसार 352 मतांचा आकडाही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे एनडीए अजूनही या जादुई आकड्यापासून सुमारे 40 हून अधिक खासदार दूर असल्याचं चित्र आहे.
आत बोलुयात महाराष्ट्रातील वाढणाऱ्य़ा ताकदीबद्दल


फक्त देशभरातच एनडीएची ताकद वाढत आहे असं नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाकडे आणि संख्याबळाकडे पाहिलं तरी महायुती दिवसेंदिवस अधिक मजबूत होताना दिसत आहे. त्यातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही एनडीएला पाठिंबा देऊ शकते किंवा महायुतीसोबत जाऊ शकते, अशा चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे विरोधकांची ताकद आणखी कमी होणार का? आणि खरंच महाराष्ट्रात प्रभावी विरोधक उरणार नाहीत का? अशी चिंता आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.


लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचं चित्र वेगळं होतं. महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, तर महायुतीला अनेक धक्के बसले. मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदललं. महायुतीने अतिशय अनपेक्षित आणि दमदार कमबॅक केलं. महाविकास आघाडीला 50 चा आकडाही पार करता आला नाही, तर महायुतीने तब्बल 200 हून अधिक जागांवर विजय मिळवला. त्यामध्ये एकट्या भाजपचे 132, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आले. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 16, ठाकरे गटाला 20 आणि शरद पवार गटाला 10 अशा मिळून अवघ्या 46-47 जागांवर समाधान मानावं लागलं.


यानंतर तब्बल 2017 पासून रखडलेल्या महापालिका निवडणुका पार पडल्या. 29 महापालिकांपैकी तब्बल 25 महापालिकांमध्ये महायुतीने सत्ता मिळवली, त्यानंतर नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 विधान परिषद जागांच्या निवडणुकीतही महायुतीने सर्व जागा जिंकल्या.यामागचं प्रमुख कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वाढलेलं संख्याबळ. 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत महायुतीने तब्बल 552 जागा जिंकल्या. त्यामध्ये भाजपच्या 225, राष्ट्रवादी (अजित पवार) 165 आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) 162 जागा होत्या. दुसरीकडे काँग्रेसला 55, ठाकरे गटाला 43 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 26 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे 12 पैकी 8 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचं वर्चस्व निर्माण झालं. पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही भाजपने सर्वाधिक जागा जिंकत आपलं संख्याबळ आणखी वाढवलं.


मात्र हा प्रवास केवळ निवडणुकांपुरता मर्यादित नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षविस्तारावर विशेष भर दिला. नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना पक्षात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ज्योती वाघमारे, बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्यांशी वाढलेली जवळीक असो किंवा नुकताच उत्तर महाराष्ट्रातील शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश असो, अशा प्रत्येक घडामोडीतून शिंदेंनी शिवसेनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला.
त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा लोकसभा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यामुळे लोकसभेत शिंदे यांच्या शिवसेनेची संख्या 13 खासदारांपर्यंत पोहोचली. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसनंतर सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून शिंदे यांच्या शिवसेनेचं स्थान अधिक मजबूत झालं आहे. त्यामुळे महायुतीच्या विस्तारात आणि संख्याबळ वाढवण्यात एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजनही वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे.
एकंदरीत पाहिलं, तर ज्या पद्धतीने एनडीए 2029 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आत्तापासून करताना दिसत आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात एकनाथ शिंदेही शिवसेनेचा विस्तार, संख्याबळ वाढवणं आणि आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करण्यावर भर देताना दिसत आहेत.


त्यामुळे देशभरात एनडीए अधिक सक्षम आणि आक्रमक होत असताना, विरोधी पक्षांची ताकद कमी होत असल्याचं चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातही महायुतीकडे इतिहासात कधी नव्हे इतकं मोठं संख्याबळ आणि राजकीय वर्चस्व निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे खरंच भविष्यात विरोधक आणखी कमकुवत होतील का? महायुतीचं वर्चस्व असंच कायम राहणार का? की पुन्हा एकदा विरोधक नव्या ताकदीने उभे राहतील? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही महिन्यांत आणि पुढील निवडणुकांमध्ये स्पष्ट होतील.