El Nino च्या प्रभावातही इतका मुसळधार पाऊस कसा.... बदललेलं गणित आहे तरी काय?

07 Jul 2026    91 Views

 El Nino च्या प्रभावातही इतका मुसळधार पाऊस कसा.... बदललेलं गणित आहे तरी काय?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय नद्या दुथडी भरून वाहत आहेत, काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. आणि या सगळ्यात सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. काही महिन्यांपूर्वी "यंदा एल-निनोमुळे दुष्काळ पडणार" असं सांगितलं जात होतं. पण आता धो-धो पाऊस सुरू झाल्यानंतर एल-निनोवरून सोशल मीडियावर असंख्य जोक्स, मीम्स व्हायरल होऊ लागल्यात.. पण खरंच... हवामान तज्ज्ञांचे अंदाज चुकीचे ठरले का? एल-निनो संपलाय का? की एल-निनो असतानाही एवढा मुसळधार पाऊस पडू शकतो? आणि बरेच प्रश्न... याच सगळ्याबद्दल आपण आज बोलणार आहोत.

..
मे आणि जून महिन्यात राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला होता. अनेक भागांत तापमान ४० अंशांच्या पुढे गेलं होतं. जूनचा बराच काळ उलटून गेला, तरी मान्सूनने समाधानकारक हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. पेरणी करावी की अजून थांबावं, हा मोठा प्रश्न होता. त्याच काळात हवामान तज्ज्ञ सातत्याने सांगत होते की, प्रशांत महासागरात एल-निनोची परिस्थिती विकसित होत आहे. इतिहास सांगतो की, एल-निनोच्या अनेक वर्षांत भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे यंदाही मान्सूनवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
इतकंच नाही, तर यंदा अधिक मासही आल्यामुळे काही पारंपरिक अभ्यासकांनीही पाऊस उशिरा येईल, अशी शक्यता व्यक्त केली होती. याच दरम्यान काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने केलेल्या अभ्यासांमध्ये १९५१ ते २०२६ या कालावधीतील आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये अधिक मास आणि एल-निनो एकत्र आलेल्या अनेक वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचं निरीक्षण समोर आलं. पण...

जुलै महिना सुरू झाला आणि अवघ्या काही दिवसांत संपूर्ण चित्र बदललं.
राज्यात पावसाने अक्षरशः रौद्ररूप धारण केलं. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि घाटमाथ्यावरील भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू झाला. महाबळेश्वरसारख्या भागात एका दिवसात २०० मिलिमीटरपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली. इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. आळंदीतील घाट पाण्याखाली गेले. कृष्णा, पंचगंगा, उल्हास आणि कोकणातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्या काही गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं. दरडी कोसळल्या. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह अनेक महामार्गांवर वाहतुकीचा वेग मंदावला. काही रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला. पूरग्रस्त भागात एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात करावी लागली.
म्हणजे काही दिवसांपूर्वी दुष्काळाची चर्चा करणारा महाराष्ट्र आता महापुराशी झुंज देताना दिसू लागला. आणि इथूनच सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला... मग एल-निनोचं काय? 

आता  हे समजून घेण्यासाठी आधी एल-निनो म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
एल-निनो हा प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान नेहमीपेक्षा वाढण्याचा नैसर्गिक हवामानाचा प्रकार आहे. समुद्राचं तापमान वाढलं की वातावरणातील वाऱ्यांची दिशा बदलते. ढग तयार होण्याची प्रक्रिया बदलते. आणि त्याचा परिणाम जगभरातील पावसाच्या पद्धतींवर होतो. भारतातही त्याचा प्रभाव मान्सूनवर पडतो. म्हणूनच एल-निनोच्या अनेक वर्षांत भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचं इतिहासात दिसून आलं आहे.

पण... इथे एक लोकांचा मोठा गैरसमज होतो. एल-निनो म्हणजे भारतात पाऊस पडणारच नाही... किंवा प्रत्येक राज्यात दुष्काळच पडेल... असं अजिबात नाही. एल-निनो हा मान्सूनवर परिणाम करणाऱ्या अनेक घटकांपैकी फक्त एक घटक आहे. मान्सूनचं खरं गणित अनेक वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतं. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं का? अरबी समुद्रातून किती ओलावा येतोय? मान्सूनचा द्रोणीय पट्टा कुठे सक्रिय आहे? समुद्राचं तापमान किती आहे? सह्याद्री पर्वतरांगांचा परिणाम काय होतोय? स्थानिक भौगोलिक परिस्थिती कशी आहे? आणि हवामान बदलाचा प्रभाव किती आहे? हे सर्व घटक एकाच वेळी काम करत असतात.
यंदा महाराष्ट्रातही नेमकं हेच घडलं. बंगालच्या उपसागरात प्रभावी कमी दाबाची प्रणाली तयार झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओलसर वारे मध्य भारताकडे सरकले. दुसरीकडे अरबी समुद्रातूनही प्रचंड प्रमाणात आर्द्रता महाराष्ट्राकडे आली. हे ओलसर वारे सह्याद्री पर्वतरांगांना धडकले. त्यामुळे हवा वर गेली, मोठ्या प्रमाणात ढग तयार झाले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. म्हणजे... एल-निनो अस्तित्वात असतानाही महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते. आणि यंदाचं उदाहरण त्याचंच आहे.पण या सगळ्यामागे आणखी एक मोठं कारण आहे...

ते म्हणजे तापत चाललेले महासागर. हवामान तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांत जगातील महासागरांचं तापमान सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे, काही भागांत यंदाचं तापमान २०२३-२४ मधील विक्रमांनाही मागे टाकत आहे. हा बदल छोटा वाटतो. एक-दोन अंशांनी समुद्र गरम झाला तर काय फरक पडणार, असं अनेकांना वाटतं. पण महासागर म्हणजे छोटंसं तळं नाही.पृथ्वीच्या जवळपास ७० टक्के भागावर पसरलेला हा प्रचंड जलसाठा आहे. त्याचं तापमान अगदी एका अंशाने वाढण्यासाठीसुद्धा अफाट ऊर्जा लागते. शास्त्रज्ञ सांगतात की, वातावरणात वाढलेल्या हरितगृह वायूंमुळे निर्माण झालेल्या अतिरिक्त उष्णतेपैकी ९० टक्क्यांहून अधिक उष्णता महासागरांनी शोषून घेतली आहे. याचाच अर्थ... महासागर आता प्रचंड प्रमाणात ऊर्जा साठवून ठेवत आहेत. आणि हीच ऊर्जा हवामानाचं स्वरूप बदलत आहे. समुद्र अधिक तापला की त्यातून अधिक पाण्याची वाफ तयार होते. वातावरणात आर्द्रता वाढते. आणि योग्य परिस्थिती निर्माण झाली की हीच अतिरिक्त आर्द्रता काही तासांत विक्रमी पावसाच्या रूपाने कोसळते.म्हणूनच आता अनेक दिवस पाऊस पडत नाही...पण जेव्हा पडतो... तेव्हा एका दिवसात महिनाभराचा पाऊस पडतो. यालाच हवामानशास्त्रात "एक्स्ट्रीम वेदर" म्हणजे टोकाचं हवामान म्हणतात. आज आपण ते प्रत्यक्ष अनुभवतोय.

दरम्यान, अधिक मास आणि एल-निनो यांच्यातील संबंधाची चर्चाही यंदा पुन्हा झाली. १९५१ ते २०२६ या कालावधीतील आकडेवारीचा एआयच्या मदतीने अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये २८ वर्षे अधिक मासाची, २२ वर्षे एल-निनोची आणि १२ वर्षे दोन्ही एकत्र आल्याची नोंद आढळली. या १२ वर्षांपैकी सात वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. मात्र हवामानशास्त्रज्ञ स्पष्ट सांगतात की, हा अंतिम वैज्ञानिक निष्कर्ष नाही. हे केवळ निरीक्षणांवर आधारित विश्लेषण आहे.यावर अधिक संशोधनाची गरज आहे. म्हणूनच फक्त अधिक मास किंवा एल-निनो यांच्याकडे पाहून संपूर्ण मान्सूनचा अंदाज बांधणं योग्य ठरत नाही. तर आता हवामानाचं स्वरूप बदलत आहे.  त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या मीम्स पाहून "एल-निनो फेल झाला" असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. एल-निनो अजूनही हवामानावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे.
मात्र तो एकमेव घटक नाही. आणि हवामान बदलामुळे या प्रक्रियांची गुंतागुंत आणखी वाढत चालली आहे. म्हणूनच पुढील काळात आपल्याला दुष्काळ आणि महापूर या दोन्ही टोकांच्या परिस्थितींसाठी तयार राहावं लागणार आहे. आणि कदाचित हेच येणाऱ्या काळातील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थाबुंया.