Jayant Patil आणि Vinod Tawade यांची भेट NDA साठी महत्त्वाची NCP साठी कशी ठरणार?
08 Jul 2026 92 ViewsJayant Patil आणि Vinod Tawade यांची भेट NDA साठी महत्त्वाची NCP साठी कशी ठरणार?
भाजपमधील असा एक नेता, ज्यांनी पक्षात इतकं मोठं स्थान निर्माण केलं की आज देशभरातील विविध राज्यांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जातेते नाव म्हणजे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना आणि आजही दोन्ही गट वेगळे झाल्यानंतरही एक नाव कायम चर्चेत राहतं, ते म्हणजे जयंत पाटील. आता या दोन्ही पक्षांतील हे महत्त्वाचे नेते एका हॉटेलमध्ये भेटतात. त्यांच्यात अनेक तास चर्चा होते. आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येतं. ही भेट नेमकी कशासाठी झाली? कोणत्या विषयावर चर्चा झाली?
पहिली शक्यता म्हणजे जयंत पाटील यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू आहे का? आणि त्यासाठीच ही बैठक झाली का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दुसरी आणि अधिक मोठी चर्चा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची. मात्र या शक्यतेनंतरही अनेक प्रश्न निर्माण होतात. सध्या माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात महायुतीत सहभागी होऊ शकते का? जर असा निर्णय झाला, तर पक्षाला कोणती भूमिका, कोणती जबाबदारी किंवा कोणती राजकीय जागा मिळू शकते, यावर या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जयंत पाटील हे शरद पवारांचे निकटवर्तीय असल्यामुळे, शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी किंवा त्यांना महायुतीसोबत येण्याबाबत पटवून देण्यासाठी त्यांच्यामार्फत संवाद साधण्याचा प्रयत्न झाला का? अशीही चर्चा सुरू आहे.
गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी पाहिल्या तर महापालिका निवडणुका, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तसेच बदलत चाललेली राजकीय समीकरणे यामुळे राष्ट्रवादीच्या भविष्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याशिवाय अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांनी अनेक ठिकाणी एकत्रित भूमिका घेत भाजप आणि शिवसेनेला आव्हान दिलं आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊ शकतात, त्यानंतर महायुतीत सहभागी होऊन एनडीएचा घटक पक्ष बनू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या भेटीकडे विशेष लक्ष दिलं जात आहे.मात्र या चर्चांमधून आणखी काही प्रश्नही उपस्थित होतात. जर खरोखरच दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्रीकरणावर चर्चा सुरू असेल, तर शरद पवार गटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जयंत पाटील उपस्थित होते, हे समजू शकतं. पण मग सुनेत्रा पवार यांच्या गटाकडून स्वतः सुनेत्रा पवार, किंवा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांसारखे वरिष्ठ नेते या बैठकीत का नव्हते?
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये यापूर्वी काही प्राथमिक चर्चा झाली होती का? आणि त्यानंतर पुढील राजकीय समीकरणांवर भाजपसोबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती का? की अजून कोणत्याही औपचारिक चर्चेशिवाय शरद पवार गटाची भूमिका जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता?पण सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र यावी, अशी एक बाजू असली तरी राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा मतप्रवाह याच्या विरोधात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या मते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पक्षात विलीन करून घेऊ नये. त्यामुळेच थेट एनडीएसोबत पुढील राजकीय समीकरणांबाबत चाचपणी करण्यासाठी ही बैठक झाली असावी, अशी चर्चा राजकीय जाणकारांकडून केली जात आहे.
मग हे सगळं आत्ताच का? तर यामागे आणखी एक मोठं कारण सांगितलं जात आहे. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत एनडीएला पाठिंबा देऊन किंवा थेट एनडीएमध्ये सहभागी होऊन मंत्रीपद किंवा विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळवण्याची ही योग्य वेळ असल्याचं काहींचं मत आहे. त्यामुळेच हा निर्णय किंवा त्याबाबतच्या चर्चा याच काळात वेगाने सुरू असल्याचं बोललं जात आहे.
मात्र या सर्व घडामोडी आणि चर्चांवर, तसेच जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीबाबत अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही अधिकृत नेत्याकडून स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.या सर्व शक्यता सध्या केवळ राजकीय चर्चेचा भाग आहेत. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, त्यातून पुढे कोणते राजकीय निर्णय होतात, दोन्ही राष्ट्रवादी गटांबाबत काही ठोस हालचाली होतात का, की या केवळ राजकीय भेटी होत्या, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.
एकीकडे या भेटीच्या चर्चा सुरू असतानाच आणखी एक मोठी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये रंगली आहे. ती म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच वेगवेगळे मतप्रवाह असल्याची. पक्षातील काही नेत्यांचं मत आहे की, जसं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी फूट पडली, तशी परिस्थिती आपल्या पक्षात निर्माण होण्यापूर्वीच योग्य तो राजकीय निर्णय घेतला पाहिजे.
याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एनडीएमध्ये सहभागी व्हावं की नाही, याबाबत पक्षांतर्गत मतप्रवाह काय आहे, याची चाचपणी करण्याची जबाबदारी पक्षातील एका वरिष्ठ नेत्यावर सोपवण्यात आल्याची चर्चा आहे. पक्षातील खासदार, आमदार आणि महत्त्वाच्या नेत्यांचं मत जाणून घेण्याचं काम सध्या सुरू असल्याचं बोललं जात आहे.
याशिवाय, थेट महायुती किंवा एनडीएमध्ये सहभागी होण्याऐवजी बाहेरून एनडीए सरकारला पाठिंबा द्यावा का, अशीही एक भूमिका पक्षात चर्चेत असल्याचं सांगितलं जात आहे.
आता यामागचं कारण काय? तर अलीकडच्या काळात विविध पक्षांमधून जे खासदार आणि आमदार पक्षांतर करत आहेत, त्यांच्याकडून एक कारण वारंवार पुढे केलं जात आहे. ते म्हणजे मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी मिळत नाही. हे कारण खरं की खोटं, हा वेगळा विषय असू शकतो. मात्र पक्ष सोडणाऱ्या अनेक नेत्यांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचं कारण सातत्याने मांडलं आहे.
त्यामुळे आपल्या पक्षातील खासदार फुटू नयेत, विकासकामांसाठी निधी मिळावा आणि राजकीय अस्तित्वही टिकून राहावं, यासाठी बाहेरून एनडीएला पाठिंबा देणं किंवा थेट एनडीएमध्ये सहभागी होणं, हे दोन पर्याय राष्ट्रवादी काँग्रेससमोर चर्चेत असल्याचं सध्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.