Lonavala | लोणावळा, महाबळेश्वर आणि ताम्हिणीत विक्रमी पाऊस; सह्याद्रीत अतिवृष्टीचं भीषण रौद्ररूप

10 Jul 2026    96 Views

Lonavala | लोणावळा, महाबळेश्वर आणि ताम्हिणीत विक्रमी पाऊस; सह्याद्रीत अतिवृष्टीचं भीषण रौद्ररूप

 
वीकेंडला लोणावळ्याच्या भुशी डॅमवर भिजणं असो, महाबळेश्वरच्या वेण्णा लेकजवळ धुक्याचा आनंद घेणं असो, किंवा ताम्हिणी घाटातील कोसळणारे धबधबे पाहणं असो... महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी ही हक्काची पर्यटन स्थळं आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की आपण सगळेच कॅमेऱ्यात इथलं सौंदर्य टिपायला आणि पाऊस एन्जॉय करायला इथे धाव घेतो. पण यंदा जुलैच्या सुरुवातीला जे घडलं, ती केवळ पर्यटकांना सुखावणारी पावसाची सर नव्हती, तर ते निसर्गाचं एक रौद्र रूप पाहायल मिळालं . अवघ्या 48  ते 73 तासांत या पर्यटन स्थळांवर तब्बल 600 ते 1,300 मिलिमीटरपेक्षा अधिक विक्रमी पाऊस कोसळला. नेहमी पर्यटकांनी  गजबजणारे रस्ते अचानक दरडी कोसळल्यामुळे ठप्प झाले, मुंबई-पुण्याचा संपर्क तुटला आणि काही पर्यटक तिथेच अडकून पडले. अखेर पर्यटकांच्या या आवडत्या स्थळांवर पावसाने हे भयानक रूप का धारण केले? यामागे कोणती भौगोलिक आणि हवामानशास्त्रीय कारणे दडली आहेत?  हेच  आपण  पाहणार आहोत.  


सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली असून सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरांमध्ये पाऊस सुखावणारा वाटत असला, तरी महाबळेश्वर, लोणावळा आणि ताम्हिणी घाट यांसारख्या डोंगराळ आणि घाट परिसरांमध्ये मात्र पावसाने चक्क रौद्र रूप धारण केलं आहे . तर,  हवामान शास्त्रज्ञांच्या मते, जुलैच्या सुरुवातीलाच झालेल्या या अभूतपूर्व जलप्रलयामागे एकाच वेळी निर्माण झालेल्या अनेक अनुकूल हवामान प्रणाली कारणीभूत होत्या. गेल्या आठवड्यात मध्य भारतावर एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, जे पुढे ओडिशा आणि छत्तीसगडच्या दिशेने सरकले. या प्रणालीमुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या प्रचंड बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढला. त्यातच, मान्सूनच्या काळात सक्रिय असणारा कमी दाबाचा मुख्य पट्टा आधीच अनुकूल स्थितीत असताना, पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला आणखी एक उप-कमी दाबाचा पट्टा म्हणजे ऑफ-शोर ट्रफ अचानक सक्रिय झाला. जेव्हा बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही बाजूंनी आलेले प्रचंड बाष्पयुक्त वारे एकत्र आले, तेव्हा पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जणू ढगफुटीसारखी अतिवृष्टी झाली. भारतीय हवामान विभागाच्या  निकषांनुसार २४ तासांत २०४ ते २४४.५ मिमी पाऊस पडल्यास त्याला  अतिमुसळधार म्हटले जाते, तर २४४.५ मिमीपेक्षा जास्त होणारा पाऊस हा थेट विक्रमी  श्रेणीत मोडतो आणि यंदा याच श्रेणीतील पाऊस कोसळला.

या हवामान प्रणालींसोबतच सह्याद्रीची विशिष्ट भौगोलिक रचना आणि पर्वतांची उंची या पावसासाठी अत्यंत पूरक ठरली. अरबी समुद्राकडून येणाऱ्या दमट आणि बाष्पाने भरलेल्या मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रथम सामना सह्याद्रीच्या उंच आणि सरळ कड्यांशी होतो. हे वारे पर्वताला धडकून वेगाने वर उचलले जातात आणि उंचीवरील थंड हवेमुळे त्याचे ढगात रूपांतर होऊन डोंगराच्या पश्चिमेकडील भागात म्हणजे कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडतो, ज्याला हवामान शास्त्रात प्रतिरोध पाऊस  म्हटले जाते. म्हणूनच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसह पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या पश्चिम डोंगराळ भागात पावसाचा जोर नेहमीच सर्वाधिक असतो, तर पर्वतरांगेच्या पूर्वेकडील भागात म्हणजेच पर्जन्यछायेच्या प्रदेशात तुलनेने कमी पाऊस होतो. सह्याद्रीच्या या भौगोलिक रचनेमुळे मध्य महाराष्ट्रातील पश्चिम आणि पूर्व भागांतील पावसाच्या प्रमाणात हा मोठा फरक दिसून येतो, असे पुणे येथील भारतीय हवामान विभागाच्या १९८१ मधील अभ्यास अहवालातही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. 


तसेच  मागील दोन दिवसांच्या कालावधीत झालेली पावसाची नोंद पाहिली तर  लोणावळ्यात तब्बल १,२९० मिमी पाऊस पडला, जो सरासरीपेक्षा १६१ टक्के जास्त होता. त्याखालोखाल रायगड जिल्ह्यातील भिरा येथे १,१२१ मिमी ७३ टक्के, ताम्हिणी घाटात १,११० मिमी (+१२५ टक्के), शिरगाव येथे ९६० मिमी आणि महाबळेश्वर येथे ९१६ मिमी (+१०० टक्के) पावसाची विक्रमी नोंद झाली. हवामान विभागाच्या ऐतिहासिक नोंदीनुसार, यापूर्वी लोणावळ्यात २३ जुलै १९९० रोजी २४ तासांत ५७८ मिमी, महाबळेश्वर येथे १३० वर्षांपूर्वी म्हणजेच २० जुलै १८९६ रोजी ४५८ मिमी, तर भिरा येथे २४ जुलै १९८९ रोजी एकाच दिवसात ७१३ मिमी पाऊस पडला होता. ताम्हिणी घाटात नियमित वेधशाळा नसली तरी उपलब्ध स्रोतांनुसार येथे २४ तासांत ६९५ मिमी; तर सलग तीन दिवसांत १,०५५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

 आश्चर्याची बाब म्हणजे, ताम्हिणी घाटात जुलै महिन्यातील पावसाची सरासरी २,६५८ मिमी इतकी आहे, जी चेरापुंजीच्या २,८७६ मिमी या सरासरी पावसाच्या अत्यंत जवळ आहे. फक्त ताम्हिणीच नाही, तर या पट्ट्यातील शिरगाव (१,९५३ मिमी), आंबवणे (२,११३ मिमी) आणि दावडी (२,२१९ मिमी) या गावांमध्येही जुलै महिन्यात होणारा सरासरी पाऊस देशातील सर्वाधिक पावसाच्या प्रदेशांशी थेट स्पर्धा करणारा आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील हे घाटमाथे आता देशातील पावसाचे मुख्य केंद्र बनले असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा संपूर्ण डोंगराळ आणि घनदाट जंगलांचा भाग केवळ पर्यटकांचे मुख्य आकर्षण नाही, तर तो संपूर्ण राज्यासाठी जीवदायी मानला जातो.

भौगोलिकदृष्ट्या हा भाग राज्यासाठी जलसंपत्तीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातो. कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यांच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या या भागात दोन डझनहून अधिक महत्त्वाची धरणे आहेत. येथूनच पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या महानगरांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे येथे होणारा पाऊस राज्याची तहान भागवण्यासाठी आवश्यक असल्यास, तरी गेल्या काही दशकांत हवामानात होणारे बदल चिंताजनक आहेत. महाराष्ट्रात आता पावसाचे प्रमाण सातत्याने अनिश्चित होत चालले असून, कोकण पट्ट्यात आणि पालघर सारख्या जिल्ह्यांत मान्सून काळात अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. सर्वात गंभीर आणि चिंताजनक बाब म्हणजे, नैऋत्य मान्सूनच्या काळात सलग २० दिवसांपेक्षा जास्त काळ अतिवृष्टी होण्याच्या घटनांची नोंद आता महाराष्ट्रात वारंवार होत आहे.

लोणावळा, महाबळेश्वर आणि ताम्हिणी घाटात झालेला हा रेकॉर्डब्रेक पाऊस सह्याद्रीसाठी नवीन नसला, तरी हवामान बदलामुळे वाढलेली ही भयानक तीव्रता आणि अनिश्चितता भविष्यासाठी खूप मोठा धोक्याचा इशारा आहे. हा पाऊस जितका आपल्या धरणांसाठी 'अमृत' आहे, तितकाच डोंगरावरील गावांसाठी 'शाप' ठरू शकतो. त्यामुळे, निसर्गाच्या या रौद्ररूपाचा केवळ थरार न अनुभवता सह्याद्रीच्या या संवेदनशील डोंगराळ भागांचे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे ही आता आपल्या सर्वांचीच मुख्य जबाबदारी बनली आहे. 

पण, या बदलत्या हवामानाबद्दल आणि सह्याद्रीतील या मुसळधार पावसाच्या रौद्ररूपाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या भागात यंदा पावसाची काय परिस्थिती आहे? Comments मध्ये नक्की सांगा...