Mhendra Dalavi यांना मंत्रीपद मग Bharat Gogawale यांच्या मंत्रीपदाचे काय?

07 Jul 2026    91 Views

Mhendra Dalavi यांना मंत्रीपद मग Bharat Gogawale यांच्या मंत्रीपदाचे काय?

अखेर रायगडला पालकमंत्री मिळणार, असं चित्र आता दिसायला लागलं आहे. विधान परिषदेची निवडणूक पार पडली, आमदारकीचा प्रश्नही सुटला आणि त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मार्गही मोकळा झाला, अशी चर्चा सुरू आहे. कारण राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले हे सध्या एकमेकांविरोधात उघडपणे विधान करताना दिसत नाहीत.
आता हा पेच सुटला म्हणून शिवसेनेने सुटकेचा निश्वास टाकावा का? की दुसरीकडे महेंद्र दळवी यांच्या नाराजीचं आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या मागणीचं टेन्शन घ्यावं? कारण रायगडच्या राजकारणात आता पुन्हा एक नवी डोकेदुखी निर्माण झाल्याची चर्चा आहे.
नेमकं काय सुरू आहे? कोण कुणावर नाराज आहे? आणि रायगडच्या राजकारणात पुन्हा कोणता नवा ट्विस्ट आला आहे? चला, हेच जाणून घेऊयात.
 

रायगडचं नेमकं काय करायचं, असा प्रश्न सध्या महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीला पडला असावा, असं म्हणायला हरकत नाही. गमतीचा भाग सोडला, तरी सुरुवातीपासून पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला पेच आता सुटला असं वाटत असतानाच नव्याने मंत्रिपदाचा पेच निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.याचं कारण म्हणजे, विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे यांच्या विरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या जुईली दळवी या महेंद्र दळवी यांच्या कन्या आहेत. महेंद्र दळवी हे शिंदे गटाचे अलिबागचे आमदार असून त्यांचं आणि अनिकेत तटकरे यांचं राजकीय वैर अनेकदा समोर आलं आहे. दोघांमध्ये कायमच ३६ चा आकडा असल्याचं दिसून आलं आहे.
विधान परिषद निवडणुकीनंतर महेंद्र दळवी यांची नाराजी दूर करण्यात शिवसेनेला यश आलं, मात्र आता त्यांनी पालकमंत्रीपदाची मागणी केल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद दिलं, तर त्यांच्या मंत्रिपदाचं काय होणार? त्यांच्याकडे कोणतं खातं राहणार? की त्यांच्यासाठी वेगळी भूमिका ठरवली जाणार? अशा अनेक चर्चांना आता उधाण आलं आहे. हे सगळं ऐकताना थोडा गोंधळ निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे सुरुवातीपासून नेमकं काय घडलं, हा संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया.


विधानपरिषदेवेळी भरत गोगावले यांना आपले पुत्र विकास गोगावले यांना राजकारणात आणायचं होतं. त्यांना आमदारकीचं तिकीट द्यायचं होतं. दुसरीकडे, यापूर्वी अनिकेत तटकरे म्हणजे सुनील तटकरे यांचे पुत्र या मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. त्यानंतर अनिकेत तटकरे की विकास गोगावले, कुणाला उमेदवारी दिली जाणार आणि कुणाला हा मतदारसंघ सोडला जाणार यावर चर्चा सुरू असताना इथे एक स्ट्रॅटेजी आखली गेली. ज्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरू होता, त्यावर तोडगा काढण्यात आला. कारण जे पालकमंत्रीपद तटकरेंना हवं होतं, त्याचा त्याग त्यांनी आपल्या मुलाला आमदारकी मिळवून देण्यासाठी केला, असं सांगितलं जातं. शिवसेनेने इथे डाव टाकला आणि मागणी केली की, जर अनिकेत तटकरे यांना आमदारकी द्यायची असेल आणि राष्ट्रवादीला ही जागा द्यायची असेल, तर रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना द्यावं. त्यामुळे विकास गोगावले आणि भरत गोगावले यांनी माघार घेतली, असं सांगण्यात येतं.

रायगडच्या पालकमंत्री पदाला ग्रीन सिग्नल मिळालाय. अधिवेशन संपलं की घोषणा होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शब्द दिला आहे. मी आज काय कपडे घातलेत त्यावरून समजून जा की ग्रीन सिग्नल मिळालाय. माझ्या पालकमंत्री पदाचे नाव डिक्लेअर झालेलं आहे. फक्त त्याचा आदेश अधिवेशन झाल्यानंतर करू, असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितल आहे. हळूहळू आम्ही सगळ्यांना जॉईन करतो आहे. सबुरी का फल मीठा होता है. बघूया आगे आगे होता है क्या, असे सूचक वक्तव्य ते करण्यास विसरले नाहीत. हे बघा काळजी करण्याचे कारण नाही आहे. हे बघा मी दीड वर्ष थांबलो ना, मी ज्या खुर्चीची वाट पाहत होतो, आम्ही थांबलो ना आणि आता आम्ही सगळे जवळ आलो आहोत. लवकरच आठ-दहा दिवसात हे पद जाहीर केले जाईल. 

पालकमंत्री पदाचा आणि भरत गोगावले यांच्या नावाचा तिढा सुटला, असा विश्वास महायुतीत निर्माण होत असतानाच शिवसेनेतून पुन्हा एकदा एका नव्या बंडाची चर्चा सुरू झाली आणि ते नाव म्हणजे महेंद्र दळवी. महेंद्र दळवी आणि अनिकेत तटकरे यांच्यातील 36 चा आकडा काही नवीन नाही. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळीही हा वाद चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी महेंद्र दळवी यांच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळावं अशी त्यांची इच्छा होती, मात्र तटकरेंच्या खेळीमुळे कमी जागा असूनही भाजपचा अध्यक्ष निवडून आला. यामुळे भरत गोगावले आणि महेंद्र दळवी हे दोघेही नाराज झाल्याचं पाहायला मिळालं होतं.


महेंद्र दळवी यांनी अनेकदा अनिकेत तटकरे यांच्यावर उघडपणे टीका केली. महायुती एकत्र असतानाही त्यांनी आपली नाराजी लपवली नाही. याच महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र नंतर शिवसेनेने मध्यस्थी करत त्यांची मनधरणी केली आणि अखेरीस जुईली दळवी यांनी माघार घेतली.
आता रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेच होतील, असा दावा स्वतः महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे करताना दिसत आहेत. पण त्याआधी दळवींची नाराजी नेमकी काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर महेंद्र दळवी यांना मंत्रिपद द्यावं अशी त्यांची अपेक्षा असल्याचं बोललं जात आहे. सध्या महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चा जोरात सुरू आहेत. याच फेरबदलात महेंद्र दळवी यांना संधी मिळावी, अशी त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची अपेक्षा असल्याचं सांगितलं जात आहे.


याच पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांना दळवींच्या नाराजीबाबत विचारण्यात आलं. त्यावर बोलताना थोरवे म्हणाले की, महेंद्र दळवी यांची नाराजी योग्यच आहे. जिल्हा परिषद आणि विधान परिषद निवडणुकीत जे काही घडलं त्यामुळे ते दुखावले गेले आहेत. जिल्हा परिषदेत त्यांच्या पत्नीला अध्यक्षपदाची संधी देण्याचं ठरलं होतं, मात्र महायुतीतील मतभेदांमुळे ते शक्य झालं नाही. कमी सदस्यसंख्या असतानाही भाजपचा अध्यक्ष झाला, त्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी भूमिका घेतली. त्यांच्या जागी कोणताही नेता असता तरी अशीच भूमिका घेतली असती. त्यांच्या मंत्रिपदाबाबतचा अंतिम निर्णय हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारक्षेत्रात असून तो निर्णय एकनाथ शिंदेच घेतील, असं महेंद्र थोरवे एका माध्यमाशी बोलताना म्हणाले आहेत.