Nashik | ढगफुटीचं संकट टळलं, पावसाचा मार्ग बदलला, नेमकं काय घडलं?
08 Jul 2026 93 ViewsNashik ढगफुटीचं संकट टळलं, पावसाचा मार्ग बदलला, नेमकं काय घडलं?
राज्यातील अनेक भागात पावसांनं रौद्र रुप धारण केलेलं असताना ६ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमध्ये अलर्ट जारी करत, ढगफुटी देखील होऊ शकते.. सुमारे ३०० मिमी पाऊस होऊ शकतो.. असं म्हणत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. सर्व यंत्रणा कामाला लागल्या होत्या. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.. मात्र ७ जुलै रोजी चित्र बदललं असुन नाशिकवरचं अतिमुसळधार पावसांचं सकंट टळलं आहे. कारण पाऊस नाशिककडे न येता दुसरीकडे वळल्यानं मोठी संकट टळलं... त्यानंतर मग आता नाशिकवरचं संकट खरचं टळलंय का... पाऊस आता नेमका कोणत्या भागात जास्त होऊ शकतो... कोणत्या भागात काय सांगितलं आहे. या सगळ्याबद्दल आपण बोलुयात.
राज्यात मुंबई , पुणे, नाशिक, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटमाथ्यावरील अनेक भागात पावसानं अक्षरक्षः आपलं रौद्र रुप धारण केलंय. सगळीकडचं जनजीवन विस्खळीत झालं असताना 6 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, या भागात ढगफुटीसदृश अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी 300 मिलिमीटरपेक्षाही जास्त पाऊस होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. शिवाय या इशाऱ्यानंतर राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, महसूल यंत्रणा, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर गेल्या होत्या.
मात्र, अवघ्या काही तासांत हवामानातील परिस्थिती बदलली आणि ज्या पावसाची भीती नाशिकसाठी व्यक्त केली जात होती, तोच पाऊस दुसऱ्या दिशेला वळला. त्यामुळे आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, नेमके असे काय घडले की नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळले? हवामानातील कोणत्या बदलामुळे हा मोठा धोका कमी झाला? आणि पुढे काय होणार? आणि हा धोका फक्त तात्पुरता टळलाय का असे अनेक प्रश्न उपस्थि होत आहेत त्यामुळे याचे उत्तर समजून घेण्यासाठी आधी हवामानातील घडामोडी समजून घेणे आवश्यक आहे.
तर आपण जाणतो की.. यंदा पाऊस उशीरा आला...जूनचा आख्खा महिनाभर मान्सूनने अपेक्षेप्रमाणे हजेरी लावली नव्हती. राज्यातील अनेक धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर होता. शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र जुलैच्या सुरुवातीला मान्सून अचानक सक्रिय झाला आणि उत्तर कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू झाला. आणि याच काळात पालघर परिसरात वातावरणात एक तीव्र हवामान प्रणाली तयार झाली. हवामानशास्त्राच्या भाषेत तिला 'व्हॉर्टेक्स' किंवा भोवरा असे म्हणतात. ही प्रणाली म्हणजे वातावरणात कमी दाबामुळे तयार होणारे वाऱ्यांचे फिरते चक्र. अशा प्रणालीमुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्प खेचले जाते आणि ते ढगांच्या स्वरूपात एका विशिष्ट भागावर एकवटते. त्यामुळे अतिशय कमी वेळेत प्रचंड पाऊस पडतो.
याच भोवऱ्यामुळे 6 जुलै रोजी पालघरमध्ये तब्बल 450 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आणि इतक्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. आणि इथं मह्त्तवाची गोष्ट लक्षात घ्या.. हवामान विभागाच्या संगणकीय मॉडेल्सनुसार हीच प्रणाली पुढे नाशिक–त्र्यंबकेश्वरच्या दिशेने सरकण्याची शक्यता होती. जर तसे झाले असते, तर पालघरसारखीच भयंकर परिस्थिती नाशिकमध्येही निर्माण होऊ शकली असती.
याच कारणामुळे हवामान विभागाने नाशिकसाठी हाय अलर्ट जारी केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्याची माहिती दिली. संभाव्य पूरप्रवण भागांची पाहणी करण्यात आली. बचाव पथके तैनात करण्यात आली. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. फ्लॅश फ्लडचा धोका लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान 6 जुलैच्या रात्रीपासून 7 जुलैच्या पहाटेपर्यंत नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ढगफुटीची शक्यता आणखी वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते. अनेकांना वाटत होते की पुढील काही तास अत्यंत धोकादायक ठरू शकतात. मात्र निसर्गाने वेगळेच चित्र दाखवले. रातोरात वातावरणातील वाऱ्यांची दिशा बदलली. हवामानातील वरच्या स्तरावरील वाऱ्यांचा वेग आणि दिशा बदलल्यामुळे पालघरमधील तीव्र व्हॉर्टेक्स नाशिकच्या दिशेने न येता उत्तरेकडे गुजरातमधील सुरतच्या दिशेने आणि पूर्वेकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोलेच्या दिशेने सरकला. म्हणजेच ज्या ढगांनी नाशिकवर एकवटण्याची शक्यता होती, तेच ढग दुसऱ्या भागाकडे वळले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, वाऱ्यांच्या दिशेतील बदलामुळे नाशिकवरील ढगफुटीचा तातडीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. ही प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बाब ठरली.
मात्र आता याचा अर्थ नाशिकमधील पाऊस पूर्णपणे थांबला आहे का? तर त्याचे उत्तर आहे – नाही.
ढगफुटीचा धोका कमी झाला असला तरी मान्सून अद्याप सक्रिय आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ, घाटमाथा आणि डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. नदी-नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस होत असल्याने जलसाठ्यात वाढ होत आहे. गंगापूर, दारणा, भावलीसह अनेक धरणांतील पाणीसाठा वाढू लागला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात कमी झाली असली तरी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, सुरगाणा तालुक्यातील 'नार' नदी दुथडी भरून वाहत आहे. काही पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. घाटमाथ्यावर भूस्खलनाचा धोका कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. राज्यभरही प्रशासन सतर्क आहे. एनडीआरएफची 17 आणि एसडीआरएफची 6 पथके विविध जिल्ह्यांत तैनात करण्यात आली आहेत. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत.
हवामान तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या हवामान प्रणालींचा मार्ग अनेकदा काही तासांत बदलू शकतो. समुद्रावरील आर्द्रता, वाऱ्यांची दिशा, कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणि पश्चिम घाटाचा भौगोलिक परिणाम यामुळे ढगांचा प्रवास बदलतो. त्यामुळे एखाद्या भागासाठी दिलेला अतिवृष्टीचा अंदाज पुढील काही तासांत बदलू शकतो. म्हणूनच हवामान विभाग वेळोवेळी नवीन बुलेटिन जारी करत असतो आणि त्यानुसार प्रशासनही आपली तयारी बदलत असते.
एकंदरीत पाहता, मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा हा संभाव्य धोक्याच्या आधारे देण्यात आलेला होता आणि त्यानुसार प्रशासनाने योग्य वेळी संपूर्ण तयारी केली. मात्र त्यानंतर हवामानातील बदलामुळे पालघरमध्ये तयार झालेली तीव्र प्रणाली नाशिकऐवजी गुजरात आणि अहिल्यानगरच्या दिशेने सरकल्याने नाशिकवरील ढगफुटीचे तातडीचे संकट टळले. तरीदेखील मुसळधार पाऊस कायम असल्याने धोका पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करणे, नदी-नाल्यांपासून दूर राहणे, गडकिल्ल्यांवर जाणं टाळावं आणि आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडणे, हीच सध्याच्या परिस्थितीत सर्वात मोठी खबरदारी ठरणार आहे.