priyanka chaturvedi यांचा राजकारणातून सन्यास की नवी खेळी? | BJP | Shivsena

07 Jul 2026    91 Views

priyanka chaturvedi यांचा राजकारणातून सन्यास की नवी खेळी? | BJP | Shivsena

प्रियंका चतुर्वेदी राजकारणातून संन्यास घेणार? नाही... नाही... असं आम्ही म्हणत नाही आहोत, पण सध्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा जोर धरताना दिसत आहे. खरं तर या चर्चेवर स्वतः प्रियंका चतुर्वेदी यांनीही भाष्य केलं असून, त्यांच्या उत्तरामुळे विरोधकांना चपराक बसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र अचानक प्रियंका चतुर्वेदी यांच्या राजकारणातून संन्यास घेण्याची चर्चा का सुरू झाली? यामागचं कारण म्हणजे त्यांचा संपलेला राज्यसभा कार्यकाळ, त्यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी न मिळणं, त्यानंतर एनडीएतील एका विधेकयकाची त्यांनी घेतलेली उघडपणे बाजू, आणि त्यानंतर सुरू झालेल्या त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीच्या चर्चा. नेमकं काय घडलं? प्रियंका चतुर्वेदी यांनी या चर्चांवर काय उत्तर दिलं? आणि त्यांच्या पुढच्या राजकीय भूमिकेबद्दल नेमकी कोणती चर्चा सुरू आहे? हेच सविस्तर जाणून घेऊया

मुद्दा असा की, राज्यसभेच्या खासदार असलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला. ठाकरे गटाकडून त्या राज्यसभेवर गेल्या होत्या. मात्र यावेळी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही. यामागचं कारण म्हणजे महाविकास आघाडीतील जागावाटपाचं गणित. विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी आपली राज्यसभेची जागा टिकवणं गरजेचं होतं. त्यामुळे ठाकरे गटाला अपेक्षित तितक्या जागा मिळाल्या नाहीत आणि त्याचा फटका प्रियंका चतुर्वेदी यांना बसल्याचं बोललं जात आहे. मात्र, त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. तरीही जागावाटपाच्या गणितामुळे  उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना पुन्हा राज्यसभेची संधी मिळाली नाही. त्यानंतर संसदेत एक महत्त्वाचं विधेयक सादर करण्यात आलं होतं आणि त्या विधेयकाला प्रियंका चतुर्वेदी यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे त्या आता पक्षांतर करणार, अशा चर्चांना जोर आला होता. मात्र प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नाही.


आता राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर आणि पुन्हा उमेदवारी न मिळाल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी एक वेगळाच मार्ग निवडला आहे. भाजपचे खासदार नवीन जिंदल यांच्या शैक्षणिक संस्थेत त्यांनी अध्यापन क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणातील सोनीपत येथे असलेल्या ओ.पी. जिंदाल युनिव्हर्सिटीमध्ये त्या आता अध्यापनाचं काम करत आहेत. त्यामुळे राजकारणातून संन्यास घेण्याऐवजी त्यांनी राजकारणासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही नवी जबाबदारी स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे. पण यामुळेच बहुतेक त्यांच्या राजकारणातून सन्यासाची चर्चा चांगलीच रंगली आहे असं चित्र दिसत आहे. या चर्चेला विधान आल्यानंतर त्यांनी पुन्हा पोस्ट करून त्यांची भूमिका स्पष्ट केली त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहलं आहे की.राजकारणातून संन्यास? स्वप्नातही नाही! २० वर्षांची मेहनत आणि हिंमतीने मिळविलेल्या स्थानावरून निवृत्ती तर लांबची गोष्ट आहे. राजकारणात लढाई सुरूच राहील. संसदेत टिकून राहण्याच्या आजच्या चढाओढीच्या विपरीत भारताच्या विकासात हातभार लावण्याचा माझा प्रयत्न आहे. 

माझी बदनामी करणाऱ्या अशा सर्व लोकांसाठी ही चपराक असल्याचे चतुर्वेदी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.त्यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर तुर्ते तरी त्या उद्धव ठाकरेंसोबत आहेत हे दिसून येत आहे. नुकताच झालेल्या ऑपरेशन टायगरबद्दल बोलताना त्या म्हणाल्या... प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, एखाद्या नेत्याला आपल्या पक्षाबाबत नाराजी असेल, तर त्याने जनतेसमोर जाऊन स्वतःच्या बळावर निवडणूक लढवावी आणि नव्याने जनादेश मिळवावा. अशा प्रकारच्या राजकीय घडामोडींना 'ऑपरेशन टायगर' म्हणणं चुकीचं आहे. त्याला 'ऑपरेशन गद्दारी' असंच म्हणायला हवं. या प्रकरणात त्यांच्या पक्षाने संविधानाचा आधार घेत लोकसभा अध्यक्षांसमोर आपली भूमिका मांडली आहे. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असून पक्षाकडून याबाबत कायदेशीर लढा सुरू आहे.


त्यांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झाल्यास....
प्रियंका चतुर्वेदी राजकीय कारकीर्दप्रियंका चतुर्वेदी यांचं कुटुंब मूळचं मथुरेचं, पण नंतर ते मुंबईत स्थायिक झालं. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1979 रोजी मुंबईत झाला. जुहू येथील शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे विलेपार्ले येथील कॉलेजमधून कॉमर्सची पदवी घेतली. प्रियंका चतुर्वेदी यांच्या पतीचे नाव विक्रम चतुर्वेदी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांचे पती आयबीएममध्ये चॅनेल मॅनेजर आणि प्रोग्राम हेड म्हणून काम करतात. या दोघांना दोन मुले आहेत एक मुलगा आर्नव चतुर्वेदी आणि एक मुलगी अनिमा चतुर्वेदी.  राजकारणात येण्याआधी त्यांनी एका इव्हेंट आणि मीडिया कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्या ‘प्रयास चॅरिटेबल ट्रस्ट’च्या ट्रस्टीही आहेत आणि या ट्रस्टमार्फत दोन शाळा चालवल्या जातात. 2010 साली त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांची नॉर्थ-वेस्ट मुंबई यूथ काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती   करण्यात आली होती. प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या अतिशय आक्रमक आणि प्रभावी प्रवक्त्या म्हणून ओळखल्या जायच्या. न्यूज चॅनेलवरील राजकीय चर्चांमध्ये त्या नेहमी काँग्रेसची बाजू ठामपणे मांडताना दिसायच्या. पण एक घटना घडली आणि त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.  2019 साली त्यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे राफेल डील प्रकरणावर पत्रकार परिषद घेतली होती. या वेळी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी अभद्र वर्तन केल्याचा आरोप झाला.

याबाबत त्यांनी पक्षाच्या शिस्तभंग समितीकडे तक्रारही केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली; मात्र नंतर पक्षाने त्या कार्यकर्त्यांवरील शिस्तभंगाची कारवाई मागे घेतली. या संपूर्ण घडामोडींमुळे त्यांची नाराजी अधिकच वाढली आणि अखेर त्यांनी काँग्रेसपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण तेव्हाच राज्यसभेच्या देखील निवडणुका होत्या आणि काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नाही. जे की त्यांना मिळेल अशी दाट चर्चा झाली होती..त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश करताच स्पष्ट केलं होतं की त्यांनी काँग्रेस फक्त तिकीट न मिळाल्यामुळे सोडलेली नाही. त्यांच्या मते, महिलांचा सन्मान हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा मुद्दा आहे. पक्षात त्यांच्याशी अभद्र वर्तन झालं, त्यामुळेच त्या नाराज झाल्या होत्या, असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. त्यानंतर त्यांना 2019 साली राज्यसभेची खासदारकी देण्यात आली होती. त्या निवडून आल्य होत्या. त्यानंतर राज्यसभेतील थेट सत्ताधाऱ्यांना भिडणाऱ्या म्हणून त्यांची ओळख झाली. त्या अनेक मुद्द्यावर सरकारवर आक्रमकपणे टिका करतात. त्यामुळेच आदित्य ठाकरेंना ज्याप्रकारचे राजकारण अपेक्षित आहे. ते त्या करत असल्याने त्यांना पुन्हा राज्यसभेवर त्यांना पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु होते.