पालखी मार्गाची दुरवस्था! कोट्यवधी खर्चूनही Pune–Solapur महामार्गावर खड्डे

10 Jul 2026    92 Views

पालखी मार्गाची दुरवस्था! कोट्यवधी खर्चूनही Pune–Solapur महामार्गावर खड्डे

 

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रात विठुरायाचा नामजप सुरु असताना.. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी मंडळी, मोठ्या संख्येने पुण्यात दाखल झालेत.. काही होत आहेत.. पुण्यातून पंढरपूरच्या दिशेनं संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत असताना प्रशासन मात्र झोपेत आहे असचं दिसतंय... मी असं म्हणते कारण.. पालखी मार्ग पुणे- सोलापूर महामार्गाची अक्षरक्षः चाळण झाली असुन रसत्यावर मोठ्या प्रमाणात खडी आणि खड्डे पडलेत.. बरं विशेष म्हणजे आपल्या प्रशासनचं कामचं असं असतं की पहिल्या पावसात इंजिनिअरिंगचा चमत्कार मानला गेलेला प्रकल्प सुद्धा काही काळ पावसाने बाधित झाला... आणि या महामार्गाचही तसचं काहीसं झालं आहे.. या रस्त्यावर कोट्यावधी रुपये खर्च केल्याचं बोललं जातंय.. त्यामुळे आता हा विषय नेमका काय हे समजुन घेणारआहोत.


आषाढी वारी म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो लाखो वारकऱ्यांचा भक्तिमय सागर... टाळ-मृदुंगाचा गजर... "ज्ञानोबा-तुकाराम"चा अखंड जयघोष... आणि पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघालेला भक्तीचा महासागर. आपण जाणतो की वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची, सामाजिक एकतेची आणि भक्तीची शेकडो वर्षांची ओळख आहे. दरवर्षी लाखो वारकरी कोणतीही तक्रार न करता, ऊन-पाऊस सहन करत, शेकडो किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूर गाठतात. अशा या वारीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पुणे-सोलापूर मार्ग हा सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक मानला जातो. पुणे शहरातील मुक्काम संपल्यानंतर हडपसर, लोणी काळभोर, यवत, भिगवण, इंदापूर आणि पुढे पंढरपूरकडे जाणारा हा मार्ग दरवर्षी लाखो वारकऱ्यांनी गजबजून जातो. त्यामुळे हा रस्ता केवळ राष्ट्रीय महामार्ग नसून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वारशाचा अविभाज्य भाग आहे.
मात्र यंदा या महत्त्वाच्या पालखी मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हडपसरमधील रवीदर्शन चौक ते कवडीपाट टोलनाका या सुमारे पाच किलोमीटरच्या पट्ट्यात डांबरी रस्ता पूर्णपणे उखडला असून सर्वत्र बारीक खडी पसरली आहे. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, तर उड्डाणपूलासाठी खोदलेले खड्डे योग्य प्रकारे बुजवण्यात आले नसल्याने तेही खोलवर उघडे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसोबतच पायी चालणाऱ्या वारकऱ्यांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांची वाहने घसरून छोटे-मोठे अपघात होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. तर  मोठ्या वाहनांच्या चाकांमधून उडणारी खडी पादचारी आणि इतर वाहनांसाठीही धोकादायक ठरत आहे.


गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. हडपसर, शेवाळवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, सोरतापवाडी, कुंजीरवाडी आणि उरुळी कांचन परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. सेवा रस्ते चिखलमय झाले असून अनेक ठिकाणी पादचारी मार्गच उरलेला नाही. त्यामुळे वारकऱ्यांना मुख्य महामार्गावरून चालण्याची वेळ येत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहतूक कोंडीचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.


विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्तीवर यापूर्वी सुमारे २१ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र गेल्याच वर्षी या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा डांबराचा थर टाकण्यात आला. मात्र यंदाच्या पावसात तोही पूर्णपणे उखडून गेला असून पुन्हा संपूर्ण रस्त्यावर बारीक खडी पसरली आहे. त्यामुळे एवढा मोठा निधी खर्च होऊनही रस्त्याची ही अवस्था का झाली, कामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण कोणी ठेवले आणि याला जबाबदार कोण, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.


या पार्श्वभूमीवर हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, पालखी मार्गासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उखडलेल्या साईडपट्ट्या, तुटलेल्या सुरक्षा जाळ्या, चिखलमय सेवा रस्ते, वाढलेली काटेरी झाडे-झुडपे आणि साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अधिकारी केवळ पाहणी आणि बैठका घेतात, मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल होत नाही, असा आरोपही त्यांनी केला. प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष कामे सुरू करावीत, अन्यथा दोन दिवसांत कामे पूर्ण न झाल्यास लोकप्रतिनिधी, नागरिक आणि वारकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


दरम्यान स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या परिसराचा महापालिकेत समावेश होऊनही पुणे-सोलापूर महामार्ग अद्याप अधिकृतपणे पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्त्याची देखभाल, ड्रेनेज, पावसाळी वाहिन्या आणि इतर नागरी सुविधा यांची कामे रखडली आहेत. स्थानिक नागरिक प्रशांत वाघ यांनी सांगितले की, महापालिका हा रस्ता आमच्याकडे नाही असे सांगते, त्यामुळे तक्रारी करूनही कामे होत नाहीत. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर महानगरपालिकेकडे हस्तांतरित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


याबाबत हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त कुणाल धुमाळ यांनी सांगितले की, सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून पायलिंगचे खड्डेही उघडे पडले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीला या मार्गावरून पुढे जाण्यास फार कमी कालावधी शिल्लक आहे. दरवर्षी लाखो वारकरी याच मार्गाने पंढरपूरच्या दिशेने निघतात. पुणेकरांसह आसपासच्या गावांतील हजारो नागरिक पालखीला निरोप देण्यासाठी याच ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे हा मार्ग सुरक्षित, स्वच्छ आणि खड्डेमुक्त असणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा सन्मान करण्याचाही विषय आहे. आता प्रशासन युद्धपातळीवर काम करून पालखीपूर्वी हा मार्ग दुरुस्त करणार का, वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित करणार का, आणि कोट्यवधी रुपये खर्चूनही वारंवार उखडणाऱ्या या रस्त्याची जबाबदारी निश्चित करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.