Pune तुकोबांच्या पालखीमुळे वाहतुकीत मोठे बदल; प्रवासापूर्वी ही माहिती नक्की जाणून घ्या
08 Jul 2026 93 ViewsPune तुकोबांच्या पालखीमुळे वाहतुकीत मोठे बदल; प्रवासापूर्वी ही माहिती नक्की जाणून घ्या.
भेटी लागी जीवा लागलीसे आस...! विठू माऊलीच्या दर्शनाची ओढ लागलेला अवघा वारकरी संप्रदाय आता पंढरीच्या वाटेवर निघाला आहे. 7 जुलैपासून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होऊन आषाढी वारी पालखी सोहळ्याला देहूनगरीतून अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे. तसेच पालखी मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ११ ते १९ जुलै दरम्यान वाहतुकीमध्ये मोठे बदल केले असून अनेक मार्ग पर्यायी रस्त्यांवर वळवले आहेत. जर तुम्ही पुढील काही दिवसांत पुणे, सोलापूर, बारामती किंवा इंदापूर परिसरातून प्रवास करणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुकोबांच्या पालखीचा मुक्काम कुठे कधी असणार आणि त्यानुसार वाहतुकी मध्ये करण्यात आलेले बदल तसेच कोणते रस्ते बंद राहणार आहेत आणि तुमचे पर्यायी मार्ग कोणते असतील, याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम... जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे ३४१ वे वर्ष. तब्बल साडेतीन शतकांची ही अखंड परंपरा यंदा एका आगळ्यावेगळ्या आणि देखण्या रूपात पंढरीकडे मार्गस्थ होत आहे.खरं तर संत तुकाराम महाराजांची पालखी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि वारकरी संप्रदायाच्या एकतेचा जिवंत वारसा मानली जाते. एकीकडे हा अपूर्व सोहळा सुरू असतानाच, दुसरीकडे पुण्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून इंद्रायणी नदीला पूर आला आहे. यामुळेच प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव काही कडक निर्बंध लागू केले आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाविकांना देहू-आळंदीत जास्त गर्दी न करता थेट पुण्यात पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सर्वप्रथम आपण संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुख्य मार्ग समजून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला प्रवासाचा अंदाज येईल. देहूतून निघालेली ही पवित्र पालखी आकुर्डी, पुणे शहर, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उंडवडी, बारामती, सणसर, निमगाव केतकी, इंदापूर आणि सराटी मार्गे पुढील १८ दिवस प्रवास करत वाखारीवरून पंढरपूरला पोहोचते. पालखीचा हा प्रवास जसा पुढे सरकेल, तसे सुरक्षेसाठी मुख्य रस्ते बंद करून सामान्य वाहनांसाठी पर्यायी मार्ग दिले जाणार आहेत. यातील पहिला मोठा बदल १२ जुलै रोजी होईल, जेव्हा पालखीचा मुक्काम लोणी काळभोरवरून यवतच्या दिशेने असेल. या दिवशी सोलापूर हायवेवरील वाहतूक पहाटे २ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पूर्णपणे पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यानुसार, पुण्यातून सोलापूरकडे जाणारी सर्व वाहने वाघोली, केसनंद, राहू, पारगाव मार्गे चौफुला या रस्त्याचा वापर करतील, तर सोलापूरकडून पुण्यात येणाऱ्या वाहनांना चौफुला, पारगाव, राहू, केसनंद आणि वाघोली या पर्यायी मार्गाने जावे लागेल.
यानंतर १३ जुलै रोजी पालखी यवतवरून वरवंडच्या दिशेने जाईल . या मुक्कामाच्या दिवशी हायवेवर प्रचंड गर्दी असणार असल्याने प्रशासनाने १३ जुलैला पहाटे २ पासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सोलापूर महामार्गावरील मुख्य वाहतूक बंद राहील. या काळात पुण्यातून सोलापूरकडे जाणारी वाहने हडपसरवरून मगरपट्टा मार्गे लोणीकंद, केसनंद, वाघोली, राहू, पारगाव, न्हावरे, काष्टी, दौंड आणि कुरकुंभ या मार्गाने पुढे जातील. तर सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने येणारी वाहने कुरकुंभ, दौंड, काष्टी, न्हावरे, पारगाव, राहू, वाघोली आणि पुणे या मार्गाचा वापर करतील.
१४ जुलै रोजी पालखीचा प्रवास वरवंड ते उंडवडी असा असेल आणि पालखीचा मुक्काम उंडवडी येथे होईल.या दिवशी पहाटे २ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ या मार्गाने पाठवली जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १४ जुलैला बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील. येथील वाहतूक भिगवणमार्गे बारामतीला जाईल आणि बारामतीकडून येतानाही भिगवणमार्गे सोलापूर-पुणे रस्त्याला जोडली जाईल. तसेच पाटसवरून बारामतीला जाणाऱ्या वाहनांना पाटस-चौफुला-सुपा-लोणीपाटी-बारामती या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागेल.
१५ जुलै रोजी तुकोबांची पालखी उंडवडीवरून थेट बारामती शहरात मुक्कामासाठी दाखल होईल. १४ जुलैच्या नियमांप्रमाणेच १५ जुलैला देखील पहाटे २ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे रस्ते सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे बारामती शहराकडे येणारी आणि तिथून पुण्याच्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही भिगवणमार्गे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून वळवली जाईल. वाहनधारकांनी या दिवशी बारामती-पाटस रस्त्याचा वापर करणे टाळावे.
१६ जुलै रोजी पालखी बारामतीवरून सणसर मुक्कामाकडे मार्गस्थ होईल. या दिवशी बारामती आणि इंदापूर परिसराला जोडणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. १६ जुलैला पहाटे २ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती हा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील. यामुळे वालचंदनगर आणि इंदापूर बाजूकडून बारामतीकडे येथे येणारी वाहतूक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती-अष्टीकडे वळवण्यात आली आहे. तसेच बारामतीकडून जंक्शन किंवा इंदापूरकडे जाणारी वाहने भिगवण आणि कळसमार्गे जंक्शनकडे पाठवली जातील.
यानंतर १७ आणि १८ जुलै रोजी पालखीचा मुक्काम सणसरवरून निमगाव केतकी येथे असेल. हा वाहतूक बदल १७ जुलैच्या पहाटे २ वाजेपासून ते थेट १८ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत सलग दोन दिवस लागू राहणार आहे. या काळात बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती, कळंब, बावडा, इंदापूर किंवा बारामती, भिगवण, इंदापूर या मार्गाचा वापर करतील. तर इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी सर्व वाहने इंदापूर, बावडा, कळंब, बारामती किंवा इंदापूर, भिगवण, बारामती या मार्गाने प्रवास करतील.
१८ जुलैला पालखी निमगाव केतकीवरून इंदापूर शहरात मुक्कामासाठी प्रवेश करेल. या दिवशी पहाटे २ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद राहील. निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना लोणी देवकर, कळंब, जंक्शन मार्गे बारामतीकडे किंवा लोणी देवकर, भिगवण मार्गे बारामतीकडे वळवले जाईल.
१९ जुलै हा पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा दिवस असेल, कारण या दिवशी पालखी इंदापूरवरून सराटी मुक्कामाकडे निघेल. या दिवशी इंदापूर शहरांतर्गत वाहतुकीत मोठे बदल असतील. १९ जुलैला पहाटे ४ पासून रात्री ८ वाजेपर्यंत इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बायपासने म्हणजेच वळण रस्त्याने सोडली जाईल. तसेच अकलूजकडून बारामती आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी इंदापूर मुख्य महामार्गाचा वापर करावा. या सोहळ्याचा शेवटचा मोठा बदल म्हणजेच १९ जुलैच्या पहाटे २ पासून ते रात्री १२ वाजेपर्यंत इंदापूर-अकलूज रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असेल. या काळात इंदापूर ते अकलूज दरम्यान धावणारी वाहने इंदापूर, हिंगणगाव, टेंभुर्णी, गणेशगाव, माळीनगर आणि अकलूज या मार्गाने पुढे जातील, तर अकलूज ते इंदापूर या मार्गावरील वाहने अकलूज, नातेपुते, वालचंदनगर, जंक्शन आणि भिगवण या पर्यायी मार्गाचा वापर करतील.
तर, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या पालखी सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने केलेले हे होते महत्त्वाचे वाहतूक बदल. सध्या पावसाचे दिवस आहेत, अनेक भागात नद्यांना पूर आला आहे, त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना अजिबात घाई न करता शांततेने आणि काळजीपूर्वक वाहन चालवा. प्रशासनाने नेमून दिलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करा, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल, प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही आणि पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्यांनाही कोणताही त्रास होणार नाही.