Rohit Pawar बैठकील अनुपस्थिती, Sharad Pawar यांच्यासा स्वागतासाठी गैरहजर NCP त काय सुरुय?
10 Jul 2026 91 ViewsRohit Pawar बैठकील अनुपस्थिती, Sharad Pawar यांच्यासा स्वागतासाठी गैरहजर NCP त काय सुरुय?
महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत राहिलेलं, पुरोगामी राजकारणाचं सर्वात मोठं नाव म्हणजे शरद पवार. स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकं प्रभाव गाजवणारे शरद पवार तब्बल 34 वर्षांनंतर जेव्हा पुन्हा विधिमंडळात दाखल झाले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित होते, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचं स्वागत केलं. मात्र, या सगळ्यात एक चेहरा दिसला नाही... तो म्हणजे शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार. नेहमी आपल्या आजोबांना आदर्श मानणारे रोहित पवार त्यांच्या स्वागतासाठी विधिमंडळात का दिसले नाहीत? आजोबांपेक्षा त्यांना सुरू असलेलं आंदोलन महत्त्वाचं वाटलं का? की या अनुपस्थितीमागे काही वेगळंच राजकारण दडलं आहे? याच विषयावर सविस्तर बोलूयात.
नेमकं काय झालं ते सांगते... सध्या राज्यसभेचे खासदार असलेले शरद पवार, ज्यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे, ते कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादासंदर्भात बोलावण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीसाठी विधिमंडळात आले होते. तब्बल 34 वर्षांनंतर शरद पवार प्रथमच विधिमंडळात दाखल झाले. यावेळी पक्षीय मतभेद बाजूला ठेवत राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढे येऊन त्यांचं स्वागत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेतेही यावेळी उपस्थित होते. मात्र, स्वतः शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार मात्र तिथे दिसले नाहीत. त्यांच्या या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली आणि अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. मग रोहित पवार नेमके का आले नाहीत? त्यांच्या गैरहजेरीमागचं कारण काय होतं? या प्रश्नांवर अखेर स्वतः रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिलं.
डोंबिवलीत शिंदे गटाच्या एका नगरसेवकाने सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केली होती. या नगरसेवकावर पोलिसांकडून कारवाई व्हावी, यासाठी मला तिकडे जावे लागले. आम्ही आक्रमक भूमिका घेतली म्हणून नगरसेवकावर लगेच कारवाई झाली. तिथून यायला वेळ झाला म्हणून मी अधिवेशन परिसरात वेळेत पोहोचू शकलो नाही. साहेब ही गोष्ट समजून घेतील. मुद्दा असा की, रोहित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं असलं तरी एक प्रश्न उपस्थित होतोय. शरद पवारांपेक्षा त्यांना एका नगरसेवकाच्या समर्थनार्थ सुरू असलेलं आंदोलन अधिक महत्त्वाचं वाटलं का? यामुळेच त्यांच्या अनुपस्थितीची विविध कारणं चर्चेत येऊ लागली.
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलं. त्या पदासाठी रोहित पवारांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात होतं. मात्र, अखेरीस त्यांची निवड झाली नाही. त्यानंतर रोहित पवार नाराज असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले होते, "कदाचित सात वर्षांत मी कुठेतरी कमी पडलो असेन आणि म्हणूनच पक्षाने मला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली नसावी."आता रोहित पवारांचा हा आक्रमक चेहरा अजित पवार पक्षातून बाहेर पडल्यानंतर अधिक ठळकपणे दिसू लागला आहे. अगदी नुकतंच उदाहरण द्यायचं झालं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी आमरण उपोषणही केलं होतं. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे उपोषण स्थगित केलं. त्यानंतर टीईटी पेपरफुटी प्रकरणातही त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. म्हणजेच, राज्यभर दौरे, आंदोलने आणि सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत रोहित पवार स्वतःला शरद पवार गटातील प्रमुख विरोधी चेहरा म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
मे महिन्यात शरद पवारांनी पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली होती, त्या बैठकीलाही रोहित पवार उपस्थित नव्हते. आणि आता नुकत्याच पार पडलेल्या या बैठकीलाही त्यांनी गैरहजेरी लावली. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही नेते रोहित पवारांवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गेल्या शुक्रवारी शरद पवार गटाच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी थेट प्रश्न उपस्थित केला की, माध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या बातम्या येत आहेत, तर काही माध्यमांमध्ये पक्ष एनडीएला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं चाललंय तरी काय? याबाबत स्पष्ट भूमिका पक्षाने मांडावी, अशी मागणी आमदारांनी केली.
या बैठकीत भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र काँग्रेसमध्ये विलीन होण्याची वेळ आली, तर त्याचा विचार केला जाईल, अशी भूमिका मांडण्यात आल्याचं सांगितलं जातं. पण याच बैठकीत रोहित पवार काही वेळ उपस्थित राहिल्यानंतर अर्धवट बैठक सोडून निघून गेल्याचीही चर्चा आहे.याचं कारण काय? तर पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला किंवा भविष्यात भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला, तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असं पक्षातील काही आमदारांचं मत असल्याचं बोललं जात आहे. हेच आमदार भविष्यात रोहित पवारांच्या भूमिकेसोबत उभे राहू शकतात, अशीही चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार स्वतः नाराज असून भविष्यात ते आपल्या आजोबांपासून वेगळी राजकीय वाट निवडू शकतात का, अशी शक्यताही आता व्यक्त केली जात आहे. त्यामागचं मोठं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चा.काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची एका आलिशान हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा रंगली होती. ही भेट नेमकी कशासाठी झाली? तर शरद पवार गटाने एनडीएला पाठिंबा द्यावा का, यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. जर तसं झालं, तर राष्ट्रवादीला केंद्र किंवा राज्यात काही मंत्रीपदं मिळू शकतात, अशीही चर्चा आहे.
अशा परिस्थितीत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांसारख्या वरिष्ठ नेत्यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो. पण विरोधी पक्षात राहून सातत्याने संघर्ष करणाऱ्या रोहित पवारांना मात्र डावललं जाऊ शकतं किंवा त्यांच्या वाट्याला फारसं काही येणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
म्हणूनच रोहित पवार हे भाजपसोबत किंवा एनडीएसोबत जाण्याच्या पूर्णपणे विरोधात असल्याचं बोललं जात आहे. त्यांची ही नाराजीच सध्या त्यांच्या अनुपस्थितीतून आणि भूमिकेतून दिसून येत असल्याची चर्चा रंगली आहे.
आता प्रश्न असा आहे की, समजा भविष्यात शरद पवार गटाने खरंच एनडीएला पाठिंबा दिला, तर रोहित पवार काय भूमिका घेणार? सत्तेसोबत जुळवून घेऊनही मंत्रिपदासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांसाठी आपला विचार होणार नसेल, तर रोहित पवार सध्या राज्यभर आक्रमक आंदोलनं करत, रस्त्यावर उतरून स्वतःची ताकद वाढवत, भविष्यात वेगळीच राजकीय चूल मांडण्याची तयारी करत आहेत का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.