Sharad Pawar यांनी Eknath Shinde यांना भेटायचे की नाही हे Thackeray ठरवणार?

10 Jul 2026    91 Views

Sharad Pawar यांनी Eknath Shinde यांना भेटायचे की नाही हे Thackeray ठरवणार?

कोणत्याही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी कोणाशी, कधी आणि कुठे बैठक घ्यायची हा त्या पक्षाचा आणि त्या नेत्याचा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय असतो. त्या निर्णयावर त्यांच्या पक्षातील आमदार किंवा खासदार नाराज झाले, तर ते समजू शकतं. पण एखाद्या घटक पक्षाचे नेतेच त्यावर नाराजी व्यक्त करू लागले, टीका करू लागले, तर त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे.सध्या नेमकं तेच घडताना दिसत आहे. शरद पवार विधिमंडळात आले, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक घेतली, कामकाज सुरू असताना एकनाथ शिंदे स्वतः पुढे येऊन शरद पवारांची भेट घेतली. पण हे सगळं ठाकरे गटाला फारसं रुचलेलं दिसत नाही.


यामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर खासदार संजय राऊत यांनीही शरद पवारांना अप्रत्यक्षपणे सल्ला दिल्याचं बोललं जात आहे.
खरंतर सत्तेविरोधात एकत्र आलेले हे पक्ष अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून एकमेकांवर नाराज होताना दिसतात. एकीकडे काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करत असते, तर ठाकरे गट सावरकरांच्या विचारांचं समर्थन करताना दिसतो. दुसरीकडे ठाकरे गट उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका करतो, तर शरद पवार अनेकदा अदानींचं कौतुक करताना दिसतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद काही नवीन नाहीत.
मात्र, सध्या शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीमुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे. आणि त्यातून एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय... शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची मर्जी राखणं गरजेचं होतं का?


रोहित पवारांच्या अनुपस्थितीसोबतच आणखी एक गोष्ट सर्वाधिक चर्चेत राहिली, ती म्हणजे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळपास १५ मिनिटांची भेट.
नेमकं काय घडलं? कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नासंदर्भात आयोजित उच्चस्तरीय बैठकीसाठी शरद पवार अनेक वर्षांनंतर विधिमंडळात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अनेक नेते उपस्थित होते. विधिमंडळात दाखल होताच शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या दालनात गेले.


त्या वेळी एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते. मात्र शरद पवार आल्याची माहिती मिळताच त्यांनी बैठक काही काळासाठी सोडली आणि स्वतः दालनात येऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १५ मिनिटे चर्चा झाली. चर्चा संपल्यानंतर शिंदे पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेले, तर शरद पवार काही काळ त्याच दालनात आपल्या आमदारांशी चर्चा करत बसले.ही भेट शिष्टाचाराची होती की तिच्यामागे काही राजकीय संकेत होते, यावरून आता विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. कारण नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे शिंदे यांचे लोकसभेतील संख्याबळ १३ वर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीला वेगळे राजकीय अर्थ दिले जात आहेत.


पण याच भेटीमुळे उद्धव ठाकरे शरद पवारांवर नाराज असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट ठाकरे गटाला फारशी रुचलेली नसल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनीही सूचक शब्दांत प्रतिक्रिया देत शरद पवारांना अप्रत्यक्ष सल्लाच दिल्याचं पाहायला मिळालं. मग नेमकं संजय राऊत काय म्हणाले?

अख्खं विधानभवन ओस पडलं होतं का, विधानभवनाच्या परिसरात समोर राष्ट्रवादी भवन आहे, शिवसेना भवन आहे, ते कमी पडलं म्हणून विधिमंडळात भेटी घेतल्या जातात, बैठका घेतल्या जातात. यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विश्वासार्हता कमी होते. आम्ही अजित पवारांच्या दालनात जाऊन बैठक घेतली असती तर आम्ही मविआच्या विरोधात गेलो, असा अर्थ होतो. त्यामुळे मविआच्या घटकपक्षांनी नियम पाळायला पाहिजेत. शरद पवार यांच्या कालच्या कृतीने शिवसेना  अस्वस्थ आहे. या गोष्टीची गरज नव्हती. तुम्ही महाराष्ट्राला काय दाखवताय, तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देत आहात. गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर तुमच्या पक्षात झालेल्या गद्दारीविषयी बोलण्याचा हक्क नाही.
त्यामुळे या संपूर्ण घडामोडींमुळे ठाकरे गट नाराज असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र या नाराजीच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी समोर येत स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या या स्पष्टीकरणातून


“या भेटीकडे राजकीय नजरेतून बघू नये. मविआ म्हणून आम्ही एकत्र आहोत. पवारसाहेबांची तब्येत पाहता बाजूला गाडी होती. दुसऱ्या माळ्यावर बैठक होती. हा निव्वळ योगायोग आहे. यात कुठलही राजकीय प्लानिंग, संदेश देणं असं काहीही नाहीय. संजय राऊत यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाबद्दल माहित आहे. प्रत्येक गोष्टीत स्टेटमेंट देणं मला योग्य वाटत नाही. काल सुद्धा आमच्या पक्षाचं स्टेटमेंट त्यांनीच दिलं. आपण एकत्र चाललो पाहिजे या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरेंनी गैरसमज निर्माण करुन घेऊ नये” 


मात्र इथे आणखी एक मुद्दा चर्चेत येतो. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) संदर्भात कोणतीही मोठी राजकीय घडामोड घडली की, अनेकदा पक्षाची अधिकृत भूमिका येण्याआधीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रतिक्रिया देताना दिसतात. उदाहरण द्यायचं झालं तर राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळी शरद पवारांना पुन्हा संधी मिळणार की नाही, याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीची भूमिका येण्याआधी संजय राऊत यांनीच 'शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवलं जाईल,' असं वक्तव्य केलं होतं. त्याचप्रमाणे शरद पवारांची राष्ट्रवादी भाजप किंवा एनडीएला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांवरही राष्ट्रवादीकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्यापूर्वीच संजय राऊत यांनी 'या केवळ अफवा आहेत, शरद पवार कुठेही जाणार नाहीत,' असं स्पष्ट केलं होतं.


याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सूचक शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. 'प्रत्येक विषयावर दुसऱ्या पक्षाने प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू,' अशा आशयाचं वक्तव्य करत त्यांनी राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका मांडण्याचा अधिकार पक्षाकडेच असल्याचं अधोरेखित केलं. त्यामुळे संजय राऊत वारंवार राष्ट्रवादीची बाजू मांडत असल्याबद्दल राष्ट्रवादीतही काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.