Vasai-Virar-Nalasopara-Palghar | दरवर्षी पाण्याखाली, पूराचं खरं कारण, नियोजनाचा अभाव?

09 Jul 2026    91 Views

संपुर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर... जुलैच्या पहिल्याचं आठवड्यात पावसाने राज्यातील अनेक भागांना चांगलंच झोडपून काढलंय... मुंबई महानगर, ठाणे, पालघर, आणि रायगडमध्ये गेल्या ४ ते ५ दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाही.. मात्र त्यामुळे मुंबई शेजारील वसई, विरार, नालासोपारा आणि पालघरचा बऱाच भाग पाण्याखाली गेलाय, रस्ते.. रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलेत, लोकांच्या घरात पाणी शीरु लागलंय.. आणि यामुळे संपुर्ण जनजीवन विस्खळीत झालंय. आणि खरं सांगायचं तर ही काही पहिली वेळ नाही...दर पावसाळ्यात या परिसरांची हीच अवस्था होते.. मात्र प्रशासन मात्र सुस्थावलेलंच आहे.. यावर आजवर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्याला नाही.. त्यामुळे या विषयी आज आपण बोलणार आहोत.


मुंबईला लागून असलेले वसई-विरार हे उपनगर गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित झाले आहे. मोठमोठ्या इमारती, गृहसंकुले, वाढती लोकसंख्या आणि वेगाने होत असलेले नागरीकरण यामुळे या शहराचा चेहरामोहरा बदलला. मात्र या विकासासोबतच दरवर्षी पावसाळ्यात पूर येणे ही गंभीर आणि नित्याची समस्या बनली आहे. काही तास मुसळधार पाऊस पडला की शहरातील अनेक रस्ते, सोसायट्या, रेल्वे मार्ग आणि सखल भाग पाण्याखाली जातात. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होते, रेल्वे वाहतूक ठप्प होते आणि हजारो लोकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, वसई-विरारमध्ये दरवर्षी पूर का येतो? हा केवळ निसर्गाचा कोप आहे की त्यामागे मानवनिर्मित कारणेही तितकीच जबाबदार आहेत?


वसई-विरार शहर सुमारे ३८० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. या शहराची भौगोलिक रचना पाहिली तर पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला तुंगारेश्वरचा डोंगराळ परिसर आहे. पावसाळ्यात डोंगरावर पडणारे पाणी वेगाने खाली येते आणि समुद्रात जाण्यापूर्वी शहरातील सखल भागात जमा होते. याच वेळी समुद्राला मोठी भरती आली तर पाण्याचा निचरा पूर्णपणे थांबतो. त्यामुळे शहरातील रस्ते, रेल्वे रुळ आणि वस्त्या काही तासांतच पाण्याखाली जातात.
दरम्यान, गेल्या दहा ते पंधरा वर्षांत वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली. मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींमुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांनी या भागात स्थलांतर केले. औद्योगिक विकासामुळे अनेक परप्रांतीय कामगारही येथे स्थायिक झाले. मात्र या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत शहराचे नियोजन झाले नाही. पूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणावर मिठागरे, शेती आणि पाणथळ जागा होत्या. या जागा पावसाचे अतिरिक्त पाणी नैसर्गिकरित्या शोषून घेत होत्या. परंतु इमारती, गृहसंकुले आणि रस्ते उभारण्यासाठी या जागांवर मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला. त्यामुळे पाणी शोषून घेणारी नैसर्गिक व्यवस्था नष्ट झाली आणि पावसाचे पाणी थेट रस्त्यांवर साचू लागले.
याशिवाय...पूरस्थिती गंभीर होण्यामागे आणखी एक मोठे कारण म्हणजे नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण. पूर्वी पावसाचे पाणी मोठ्या नाल्यांमधून आणि खाड्यांमधून थेट समुद्रात जात असे. मात्र विकासाच्या नावाखाली अनेक नाले बुजवण्यात आले, खाड्यांमध्ये मातीचा भराव टाकण्यात आला आणि मोठ्या पाण्याच्या मार्गांऐवजी लहान सिमेंटचे पाईप टाकण्यात आले. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कमी झाला. मुसळधार पाऊस झाला की ही संपूर्ण व्यवस्था कोलमडते आणि पाणी शहरातच साचून राहते.


शहरातील अंतर्गत गटार व्यवस्थाही अनेक ठिकाणी अपुरी आणि सदोष आहे. अनेक गटारे एकमेकांना जोडलेली नाहीत आणि त्यांची क्षमता वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे थोडासा जास्त पाऊस झाला तरी गटारे तुंबतात आणि रस्ते पाण्याखाली जातात. याशिवाय कचरा व्यवस्थापनाची समस्याही पूरस्थितीसाठी मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. अनेक ठिकाणी प्लास्टिक, घरगुती कचरा आणि बांधकामाचा मलबा थेट नाल्यांमध्ये टाकला जातो. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नाले तुंबलेले असतात. दरवर्षी नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी गाळ पूर्णपणे काढला जात नाही. अनेकदा काढलेला गाळ नाल्याच्या कडेलाच ठेवला जातो आणि पहिल्याच पावसात तो पुन्हा नाल्यात वाहून जातो.


पूराचा सर्वात मोठा परिणाम पश्चिम रेल्वेवर होतो. विशेषतः नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानक परिसरात रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत होते. लाखो प्रवाशांचा मुंबईशी संपर्क तुटतो. पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका उभारताना काही पाणथळ जागांमध्ये भराव टाकल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाहही अडल्याचे बोलले जाते. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रितपणे कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यंदाही मुसळधार पावसामुळे वसई, विरार नालासोपारा पालघर परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. विरारमधील बोळींज, फुलपाडा, मनवेलपाडा, डीमार्ट परिसर, स्टेशन परिसर, कारगील नगर तसेच नालासोपाऱ्यातील मोरेगाव, तुळींज रोड, आचोळे रोड, ओस्तवाल नगर, अलकापुरी, सोपारा गाव, उमराळे आणि वसई पूर्व-पश्चिममधील अनेक भाग तीन दिवस पाण्याखाली होते. अनेक घरांमध्ये मैलामिश्रित पाणी शिरले. अन्नधान्य, फर्निचर आणि संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. दूध आणि भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही विस्कळीत झाला.


या पुरामुळे आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली ती म्हणजे वीजपुरवठा खंडित होणे. वसई पश्चिमेतील सनसिटी येथील मुख्य वीज उपकेंद्र पाण्याखाली गेल्याने खबरदारी म्हणून अनेक भागातील वीज बंद करण्यात आली. परिणामी सनसिटी, गास, निर्मळ, नालासोपारा आणि विरारमधील अनेक नागरिकांना सलग तीन दिवस अंधारात राहावे लागले. वीज नसल्यामुळे मोबाईल चार्ज करता येत नव्हते, इंटरनेट सेवा बंद पडली होती आणि मोबाईल टॉवर्सचे बॅकअपही संपले. त्यामुळे अनेक नागरिकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला. 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम पूर्णपणे ठप्प झाले.


२०१८ मध्ये आलेल्या मोठ्या पुरानंतर महापालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आणि आयआयटीच्या तज्ज्ञांकडून अभ्यास करून घेतला होता. या अहवालात नैसर्गिक नाले मोकळे करणे, कल्व्हर्ट बांधणे, रस्त्यांची उंची वाढवणे आणि धारण तलाव विकसित करणे अशा अनेक उपाययोजना सुचवण्यात आल्या होत्या. नालासोपाऱ्यातील निळेमोरे, गोगटे सॉल्ट आणि नायगाव येथे धारण तलाव उभारण्याचे नियोजनही करण्यात आले. मात्र अनेक वर्षे उलटूनही या प्रकल्पांची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. निळेमोरे धारण तलावासाठी अनेक वेळा निविदा काढण्यात आल्या, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने प्रकल्प रखडला असून आता सुमारे ४०० कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.


तज्ज्ञांच्या मते, वसई-विरारमधील पूर ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून ती मोठ्या प्रमाणावर मानवनिर्मित आहे. नैसर्गिक नाले, खाड्या आणि पाणथळ जागांवरील अतिक्रमण हटवणे, धारण तलाव तातडीने विकसित करणे, आधुनिक ड्रेनेज व्यवस्था उभारणे, कचरा व्यवस्थापन प्रभावी करणे आणि दीर्घकालीन पूरनियंत्रण आराखडा तयार करणे ही काळाची गरज आहे. वसई-विरार हे देशातील वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. मात्र नियोजनाशिवाय झालेल्या विकासाची किंमत येथील नागरिकांना दरवर्षी पुराच्या रूपाने मोजावी लागत आहे. जर प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणांनी आता तरी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात ही पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.