अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार! आठ वर्षीय विद्यार्थ्याचा हात चावल्याचा, गळा दाबल्याचा प्राचार्यावर आरोप; पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

31 Jul 2026    3 Views    ताज्या बातम्या

अहिल्यानगर शहराजवळील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याला शाळेच्या प्राचार्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्याचा हात चावणे आणि गळा दाबून काही सेकंद हवेत उचलून धरल्याचा दावा पालकांनी केला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात प्राचार्यांविरोधात बाल न्याय (JJ Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्गातील वादातून प्रकार घडल्याचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर शहराजवळील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला. इयत्ता तिसरीतील काही विद्यार्थ्यांमध्ये वर्गात वाद सुरू होता. यावेळी संबंधित आठ वर्षीय विद्यार्थ्याने ही बाब वर्गशिक्षिकेच्या लक्षात आणून दिली.यानंतर वर्गशिक्षिकेने शाळेचे प्राचार्य गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावले. त्यानंतर विद्यार्थ्यांना समज देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, याच वेळी प्राचार्यांनी संबंधित विद्यार्थ्यासोबत अमानुष वर्तन केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

गळा दाबून हवेत उचलल्याचा आरोप

विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्राचार्यांनी वर्गात आल्यानंतर काही विद्यार्थ्यांचे कान पिळले. त्यानंतर “भांडण कसे करतात ते दाखवतो,” असे म्हणत आठ वर्षीय विद्यार्थ्याचा गळा पकडल्याचा आरोप करण्यात आला आहे.तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की, प्राचार्यांनी विद्यार्थ्याला काही सेकंद हवेत उचलून धरले. त्यानंतर त्याच्या हाताचा चावा घेतल्याचेही पालकांनी म्हटले आहे.या घटनेनंतर विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत घरी गेला. त्याच्या हातावरील जखम आणि मानसिक स्थिती पाहून पालकांना प्रकाराची माहिती मिळाली.

पालकांची पोलिसांत धाव; JJ Act अंतर्गत गुन्हा दाखल

विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राचार्य गौतम बहादुर्गे यांच्याविरोधात बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.पालकांनी आरोप केला आहे की, लहान मुलावर अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक दबाव टाकणे हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी,

प्राचार्यांनी माफी मागितल्याचा पालकांचा दावा

 अशी मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान, घटना समोर आल्यानंतर पालकांनी प्राचार्यांशी संपर्क साधला असता, “माझ्याकडून चूक झाली असून मी लेखी माफी मागतो,” असे त्यांनी सांगितल्याचा दावा पालकांनी केला आहे.मात्र, विद्यार्थ्यांशी अशा प्रकारे वागणे योग्य नसून शाळेतील सुरक्षित वातावरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. घटनेची सत्यता, संबंधितांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.दरम्यान, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध कायदे करण्यात आले आहेत. अशा घटनांमुळे पुन्हा एकदा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.अहिल्यानगरमधील या प्रकरणात आता पोलिसांच्या तपासातून नेमके तथ्य समोर येणार आहे.