राज ठाकरेंच्या भेटीसाठी तासभर प्रतीक्षा; गोल्ड मेडलिस्ट दिलीप गावित आणि प्रशिक्षक नाराज होऊन परतले
07 Aug 2026 2 Views ताज्या बातम्यानाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी शासकीय विश्रामगृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. मात्र याच ठिकाणी त्यांची भेट घेण्यासाठी आलेले राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते पॅराअॅथलीट दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना तब्बल एक ते दीड तास प्रतीक्षा करावी लागली. अखेर भेट न झाल्याने दोघांनी नाराजी व्यक्त करत तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
दिलीप गावित हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 100 मीटर पॅराअॅथलेटिक्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू आहेत. ते आपल्या प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यासह राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहात पोहोचले होते. मात्र त्यावेळी राज ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीत व्यस्त असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.
बराच वेळ प्रतीक्षा करूनही भेटीची वेळ निश्चित न झाल्याने दिलीप गावित आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी परत जाण्याचा निर्णय घेतला. "भेट द्यायची नव्हती तर बोलावलं कशाला?" असा सवाल उपस्थित करत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मनसे पदाधिकाऱ्यांचे समजूत काढण्याचे प्रयत्न
दिलीप गावित आणि वैजनाथ काळे हे तेथून निघून जात असताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना थांबवून राज ठाकरे यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासनही देण्यात आले. मात्र बराच वेळ वाट पाहिल्यानंतर दोघांनीही थांबण्यास नकार दिला आणि तेथून रवाना झाले.
या घटनेनंतर उपस्थितांमध्येही विविध चर्चांना उधाण आले. एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला एवढा वेळ प्रतीक्षा करावी लागल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली.
"आम्ही नाराज नाही, पण वेळेचे महत्त्व आहे"
घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी संयमित प्रतिक्रिया दिली. "राज ठाकरे बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे भेट होऊ शकली नाही. त्यात काही मोठी गोष्ट नाही. आम्ही नंतर पुन्हा भेटू. आम्ही महाराष्ट्राचे आहोत आणि महाराष्ट्र तसेच देशासाठी काम केले आहे," असे त्यांनी सांगितले.
तसेच त्यांनी स्पष्ट केले की, "आमच्या प्रशिक्षणाची वेळ झाली होती. दिलीपच्या सरावावर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही निघण्याचा निर्णय घेतला. आम्ही बराच वेळ बसलो होतो. खेळाडूंच्या वेळेलाही तितकेच महत्त्व असते."
दिलीप गावितच्या वेळेचा प्रश्न
वैजनाथ काळे यांनी सांगितले की, खेळाडूंसाठी नियमित सराव अत्यंत महत्त्वाचा असतो. भेटीसाठी वाट पाहताना प्रशिक्षणाची वेळ निघून जात असल्याने त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कोणावरही थेट आरोप न करता, खेळाडूंच्या वेळेचा आणि योगदानाचा योग्य सन्मान व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, राज ठाकरे यांचा नाशिक दौरा आणि पक्षाच्या संघटनात्मक बैठका सुरू असताना घडलेल्या या प्रकाराची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. या घटनेवर मनसेकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.