बस्तर फिरायला निघालेल्या मुंबईच्या तरुणीचा अपघाती मृत्यू; 15 तास आधीच केली होती ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर’ पोस्ट
13 Aug 2026 5 Views ताज्या बातम्यारायपूर : छत्तीसगडमधील बस्तरचा निसर्ग आणि सौंदर्य अनुभवण्यासाठी बाईकवरून निघालेल्या मुंबईच्या २४ वर्षीय तरुणीचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. कांदिवली पश्चिम येथील रहिवासी असलेल्या रिद्धी ठक्करचा धमतरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वर मरकाटोला घाटाजवळ अपघात झाला. बस्तरच्या दिशेने सुरू झालेला तिचा प्रवास अखेरचा प्रवास ठरला. रिद्धीच्या निधनाने तिच्या मित्रपरिवारासह बाईक रायडिंग करणाऱ्या समूहावर शोककळा पसरली आहे.
रिद्धी ही तब्बल २३ जणांच्या बाईक रायडिंग ग्रुपसोबत छत्तीसगडमधील बस्तरला फिरण्यासाठी निघाली होती. सर्वजण वेगवेगळ्या दुचाकींवरून प्रवास करत होते. बुधवारी पहाटे साधारण ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास ग्रुपमधील अनेक रायडर्स पुढे निघून गेले होते. रिद्धी आणि तिच्यासोबत काही मोजके साथीदार मागे राहिले होते. याचदरम्यान मरकाटोला घाटाच्या परिसरात तिच्या दुचाकीला भीषण अपघात झाला.
मागून आलेल्या भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक
मिळालेल्या माहितीनुसार, रिद्धी तिच्या MH 13 SP 0835 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होती. ती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वरून बस्तरच्या दिशेने जात असताना मागून आलेल्या एका भरधाव ट्रेलरने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिद्धी दुचाकीवरून रस्त्यावर फेकली गेली आणि गंभीर जखमी झाली.
अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रिद्धीला तातडीने उपचारासाठी चारामा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारांसाठी धमतरी येथील श्रीराम रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रिद्धीला मृत घोषित केले.
रिद्धीच्या अपघाती मृत्यूची बातमी तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या मित्रांना समजताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही वेळापूर्वीच एकत्र प्रवास करणाऱ्या ग्रुपमधील एका साथीदाराचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
अपघातानंतर ट्रेलर चालक फरार
या भीषण अपघातानंतर ट्रेलर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. पोलिसांकडून अपघाताच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. रिद्धीच्या दुचाकीला धडक देणारा ट्रेलर नेमका कोणता होता, त्याचा क्रमांक काय होता आणि चालक कोण होता, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
महामार्गावरील उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून ट्रेलरची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अपघाताच्या वेळी परिसरातून गेलेल्या अवजड वाहनांचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात असल्याचे समजते.
‘लेट्स एक्सप्लोर बस्तर’… 15 तास आधीची पोस्ट ठरली अखेरची
रिद्धी बस्तरच्या प्रवासाबाबत प्रचंड उत्सुक होती. अपघाताच्या अवघ्या १५ तास आधी तिने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर’ असं लिहित तिने आपल्या प्रवासाची उत्सुकता व्यक्त केली होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. ज्या बस्तरच्या भटकंतीसाठी ती मित्रांसोबत निघाली होती, त्याच प्रवासात तिचा दुर्दैवी अंत झाला.
रिद्धीच्या या शेवटच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा तिच्या मित्रपरिवारात आणि बाईक रायडिंग समुदायात होत आहे. काही तासांपूर्वी आनंदाने सुरू केलेल्या प्रवासाचा असा दुर्दैवी शेवट होईल, याची कल्पनाही कोणाला नव्हती.
तीन वर्षांपासून बाईक रायडिंगची आवड
रिद्धी ठक्कर ही केवळ बाईक रायडर नव्हती, तर ती एक उत्तम मेकअप आर्टिस्ट म्हणूनही काम करत होती. गेल्या तीन वर्षांपासून ती बाईक रायडिंग करत होती. देशातील विविध ठिकाणी बाईकवरून प्रवास करण्याची तिला आवड होती. साहसी प्रवास आणि रायडिंगची आवड असलेल्या रिद्धीने आपल्या या छंदाला सातत्याने जोपासले होते.
विशेष म्हणजे, नुकतेच तिने कझाकिस्तानमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप मेकअप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. व्यावसायिक क्षेत्रासोबतच बाईक रायडिंगमध्येही तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांपासून मित्रमैत्रिणींपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
ग्रुपमधील अनेक रायडर्स पुढे गेले होते
अपघाताच्या काही वेळ आधी बाईक रायडिंग ग्रुपमधील अनेक सदस्य पुढे निघून गेले होते. रिद्धी आणि काही साथीदार मागे होते. त्याच काळात मरकाटोला घाटाजवळ हा अपघात झाला. त्यामुळे नेमका अपघात कसा घडला, त्यावेळी रिद्धीसोबत किती जण होते आणि ट्रेलरचा वेग किती होता, यासह अन्य बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, अपघातानंतर फरार झालेल्या ट्रेलर चालकाला शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे ट्रेलरची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बस्तरच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी, मित्रांसोबत आठवणी निर्माण करण्यासाठी निघालेल्या रिद्धीचा प्रवास मात्र महामार्गावरील एका भीषण अपघातामुळे कायमचा थांबला. ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर’ म्हणत सुरू झालेला तिचा प्रवास तिच्या आयुष्यातील अखेरचा प्रवास ठरला. तिच्या अकाली निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि रायडिंगच्या विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.