गुजरातच्या तरुणाला नागपुरात ‘लुटेरी दुल्हन’चा फटका; लग्नाआधीच लाखोंची फसवणूक, मुख्य आरोपी महिला अटकेत
01 Aug 2026 1 Views ताज्या बातम्यालग्नासाठी जोडीदाराच्या शोधात नागपुरात आलेल्या गुजरातमधील एका तरुणाची मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न ठरवून देण्याच्या बहाण्याने तरुणाकडून रोख रक्कम आणि दागिने घेण्यात आले. मात्र लग्नाच्या दिवशीच नियोजित वधू आधीच विवाहित असल्याचे उघड झाले आणि संपूर्ण प्रकाराचा भांडाफोड झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.गुजरातमधील भावनगर येथील 35 वर्षीय आकाश पारेख हे कुरिअर व्यवसाय करतात. त्यांना लग्नासाठी मुलगी पाहायची होती. नागपुरात एक योग्य मुलगी असल्याची माहिती एका परिचित व्यक्तीने दिल्यानंतर ते मार्च महिन्यात नागपुरात आले होते. मात्र, येथे त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक धक्का बसला.
लग्नासाठी मुलगी दाखवली, पण रचला फसवणुकीचा कट
या प्रकरणातील मुख्य आरोपी राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे हिने आकाश पारेख यांना नम्रता धकाते नावाच्या 21 वर्षीय तरुणीशी लग्न करण्यासाठी दाखवले. सर्व काही सुरळीत असल्याचे भासवण्यात आले. आकाश यांनी मुलीचे घर आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली.त्यानंतर कोराडी परिसरातील एका व्यक्तीच्या घरी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याच वेळी लग्नाची तयारी देखील सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, लग्नासाठी काही खर्च करावा लागेल तसेच नवरीसाठी दागिने खरेदी करावे लागतील, अशी अट आरोपींकडून ठेवण्यात आली.या बहाण्याने आकाश यांच्याकडून एटीएममधून 70 हजार रुपये रोख काढून घेण्यात आले. याशिवाय त्यांच्याकडे असलेले सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने देखील घेण्यात आले. यात सोन्याचे मंगळसूत्र, कानातील दागिने आणि चांदीच्या पैजणीचा समावेश होता.
मंदिरात लग्नाचे आश्वासन देऊन घातला गंडा
सुरुवातीला कोराडी येथे लग्न लावण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नंतर अचानक योजना बदलण्यात आली. सीताबर्डी येथील मंदिरात लग्न लावून दिले जाईल आणि तेथे लग्नाचे प्रमाणपत्रही मिळेल, असे सांगण्यात आले.दुसऱ्या दिवशी आकाश पारेख यांना घेऊन सर्वजण सीताबर्डी परिसरातील मंदिरात पोहोचले. मात्र, तेथे पोहोचल्यानंतर अचानक एक तरुण आला आणि त्याने नम्रता ही आपली पत्नी असल्याचा दावा केला.यावेळी त्याने आकाश यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. “ही माझी पत्नी आहे, तुम्ही तिच्याशी लग्न कसे करू शकता?” असे म्हणत त्याने गोंधळ घातला. त्यानंतर काही साथीदारांनीही आकाश यांच्यासोबत वाद घातला आणि त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.या गोंधळाचा फायदा घेत आरोपी महिलांसह तेथून पसार झाले. नम्रता ही देखील तिच्या कथित पतीसोबत दुचाकीवरून निघून गेली. त्यामुळे आकाश यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
पोलिसांच्या तपासानंतर मुख्य आरोपी जाळ्यात
या घटनेनंतर आकाश पारेख यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर तथाकथित वधू नम्रता धकाते हिला अटक करण्यात आली होती. मात्र, या संपूर्ण कटाची मुख्य सूत्रधार असलेली कोमल जितेंद्र पांडे ही फरार होती.पोलिसांकडून तिचा सातत्याने शोध सुरू होता. अखेर 30 जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे कोमल पांडे ही नागपूरच्या पाचपावली परिसरातील तिच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला अटक केली.31 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोमल पांडे हिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
टोळीत आणखी आरोपी असल्याचा पोलिसांना संशय
या प्रकरणात आणखी काही व्यक्ती सहभागी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कोराडी येथे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, त्या ठिकाणच्या व्यक्तींची भूमिकाही तपासली जात आहे.फसवणूक झालेली रोख रक्कम आणि दागिने अद्याप परत मिळालेले नाहीत. आरोपींच्या चौकशीतून या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारे आणखी किती लोकांना गंडा घातला आहे, याचा शोध घेतला जात आहे.नागपूर पोलिसांनी अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकांना पुढे येऊन संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. लग्न जुळवताना कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करण्यापूर्वी योग्य पडताळणी करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.