पुण्यात रील स्टार्सच्या टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला; कोयत्याने वार, प्रसिद्ध रील क्रिएटरसह 7 जणांना अटक

17 Aug 2026    7 Views    ताज्या बातम्या

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत असताना आता त्याचे पडसाद सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील क्रिएटर्सच्या वर्तुळातही उमटत असल्याचे दिसून आले आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील ‘कॅफे फ्लाईंग जिप्सी’ येथे एका 19 वर्षीय तरुणावर कोयता आणि इतर शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून प्रसिद्ध रील क्रिएटर माधवी कुंभार हिच्यासह सात जणांना अटक केली आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे.

‘याला जिवंत सोडू नका’, म्हणत हल्ला

या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव अथर्व प्रमोद जगताप (19) असून तो आंबेगाव परिसरात राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (15 ऑगस्ट) पहाटे सव्वातीनच्या सुमारास अथर्व हा शिरोळे रोडवरील कॅफे फ्लाईंग जिप्सी येथून बाहेर पडत होता.

त्यावेळी काही जण आधीपासूनच त्याच्या येण्याची वाट पाहत असल्याचे सांगण्यात येते. अथर्व बाहेर येताच आरोपींनी त्याला अडवले. ‘तू मुलींना काय बोलला? आमच्यासोबत चल, तुला दाखवतो,’ असे म्हणत त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

परिस्थिती चिघळल्याचे लक्षात येताच अथर्वने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि तो पुन्हा कॅफेच्या आत गेला. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग करत कॅफेमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर आरोपींनी ‘याला जिवंत सोडू नका’ असे म्हणत अथर्ववर शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर वार करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी कॅफेमधील खुर्च्यांचा वापर करत त्याला मारहाण केली. लाथाबुक्क्यांनीही त्याला मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात अथर्व गंभीर जखमी झाला.

साताऱ्यातील जुन्या वादातून हल्ला?

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना या हल्ल्याचे कनेक्शन थेट साताऱ्याशी असल्याचे आढळून आले आहे. फिर्यादी अथर्व जगताप आणि आरोपी तरुणी एकमेकांच्या परिचयाचे असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वी साताऱ्यातील कास पठार परिसरात स्टंटबाजीच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता. कारला कट मारल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे सांगितले जाते. त्यावेळी झालेल्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात कायम असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

याच जुन्या वादातून पुण्यात अथर्ववर हल्ला करण्याचे नियोजन करण्यात आले का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

प्रसिद्ध रील क्रिएटर माधवी कुंभारला अटक

हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत अथर्वने थेट डेक्कन पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराची माहिती देत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई करत प्रसिद्ध रील क्रिएटर माधवी कुंभार (काळेपडळ, हडपसर), स्नेहल सोनके (पिंपळे गुरव) आणि शार्दुल ओव्हाळ (हडपसर) यांच्यासह एकूण सात जणांना अटक केली आहे.

या आरोपींसोबत आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय असून, 7 ते 8 अज्ञात साथीदारांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सोशल मीडिया वर्चस्वातून गुन्हेगारीचा आरोप

या घटनेमुळे पुण्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि रील क्रिएटर्सच्या वर्तुळात सुरू असलेल्या वादांकडेही लक्ष वेधले गेले आहे. सोशल मीडियावरील वर्चस्व, जुन्या वादातून निर्माण झालेला राग आणि टोळक्याने केलेली मारहाण यामुळे हा प्रकार गंभीर बनला आहे.

दरम्यान, कॅफे आणि परिसरात यापूर्वीही गोंधळ आणि मारामारीच्या घटना घडल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची भूमिका, हल्ल्यामागील नेमका उद्देश आणि इतर संशयितांचा सहभाग याचा तपास डेक्कन पोलीस करत आहेत.