रेणावी घाटात दोन एसटी बसची भीषण धडक; मृतांचा आकडा 3 वर, 38 जखमी
14 Aug 2026 6 Views ताज्या बातम्याविजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर विट्याजवळील रेणावी घाटात दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी साक्षी चंद्रकांत पवार हिचा मृत्यू झाला. या अपघातात यापूर्वी दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात एकूण 38 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 17 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
रेणावी घाटात दोन एसटी बसची धडक
गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रेणावी घाटातील वळणावर हा अपघात झाला. विटा आगाराची विटा-भिवघाट बस क्रमांक MH 14 BT 3255 विट्याहून भिवघाटच्या दिशेने जात होती. त्याचवेळी मेढा आगाराची विजापूर-मेढा बस क्रमांक MH 14 BT 4270 घाटातून विट्याच्या दिशेने येत होती.
घाटातील वळणावर दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, उतारावर मेढा आगाराच्या बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस वेगाने समोरून येणाऱ्या विटा आगाराच्या बसवर आदळली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले.
दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू
या अपघातात खानापूर येथील नंदा हरि दास त्र्यंबके (60) आणि सातारा जिल्ह्यातील बांबवडे येथील धोंडीराम लक्ष्मण पाटील (78) यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर जखमींना तातडीने विटा येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातात विद्यार्थी आणि शाळकरी मुला-मुलींचाही समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
17 वर्षीय साक्षीचा उपचारादरम्यान मृत्यू
शुक्रवारी सकाळी विटा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या साक्षी चंद्रकांत पवार हिची प्राणज्योत मालवली. साक्षी ही खानापूर तालुक्यातील ऐनवाडी गावची रहिवासी होती. ती विट्यातील बळवंत महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती.
अपघातात साक्षीच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. साक्षीच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर ऐनवाडी गावासह संपूर्ण खानापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
साक्षीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे समोर आले आहे. तिच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते. तिची आई इस्त्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. साक्षीला एक छोटी बहीण आहे. कुटुंबासाठी आधार असलेल्या या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत
दरम्यान, या भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आहे.
आमदार बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर रात्रीपासून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सातत्याने चर्चा करण्यात आली. त्यानंतर मृत प्रवाशांच्या वारसांना परिवहन विभागाकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन करणार
या अपघातातील जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार आणि एसटी महामंडळाकडून केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, रेणावी घाटातील अपघाताचे नेमके कारण आणि बसचालकाचे नियंत्रण कशामुळे सुटले, याचा तपास सुरू आहे. घाटातील धोकादायक वळण, वाहनाचा वेग आणि रस्त्याची परिस्थिती या सर्व बाबींचा तपास केला जाण्याची शक्यता आहे. या भीषण अपघातामुळे विजापूर-गुहागर महामार्गावरील वाहतूक आणि घाटातील रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.