17 तास मृत समजून अंत्यविधीची तयारी, अचानक शरीरात हालचाल; 9 दिवसांनी अखेर मृत्यू
11 Aug 2026 16 Views ताज्या बातम्यालखनऊ : आयुष्य आणि मृत्यू यांच्यातील अंतर किती अनिश्चित असतं, याचा धक्कादायक अनुभव उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका कुटुंबाला आला. ६५ वर्षीय शीला देवी यांना रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली. मात्र, तब्बल १७ तासांनंतर त्यांच्या शरीरात हालचाल जाणवली. त्यानंतर त्या जिवंत असल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं. विशेष म्हणजे, त्यानंतर तब्बल नऊ दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. मात्र, रविवारी उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला.
डॉक्टरांनी मृत घोषित केलं, कुटुंबीयांनी अंत्यविधीची तयारी केली
शीला देवी उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील ट्रान्स यमुना कॉलनी परिसरात आपल्या मुलासोबत राहत होत्या. त्यांना श्वसनाशी संबंधित आजार होता. गेल्या काही काळापासून त्यांच्यावर बरेली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.३० जुलै रोजी उपचार सुरू असताना डॉक्टरांनी शीला देवी यांना मृत घोषित केलं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांचं पार्थिव आग्रा येथे आणलं. घरी पार्थिव पोहोचल्यानंतर कुटुंबीयांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली. नातेवाईकांना माहिती देण्यात आली. तसेच अंत्यसंस्कारासाठी फुलं आणि हार मागवण्यात आले.
पाया पडताच जाणवली शरीरात हालचाल
अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच एक अनपेक्षित घटना घडली. कुटुंबातील एक सदस्य शीला देवी यांच्या पाया पडला. याच वेळी त्यांच्या शरीरात हालचाल जाणवली. सुरुवातीला कुटुंबीयांना यावर विश्वास बसला नाही. मात्र, काही वेळाने शीला देवी यांनी डोळे उघडले आणि कुटुंबीयांशी संवाद साधण्यास सुरुवात केली.“तुम्ही सगळे का रडताय? मला कुठे नेत आहात?” असे प्रश्न त्यांनी कुटुंबीयांना विचारल्याचे सांगण्यात येत आहे. मृत समजलेल्या व्यक्तीला अचानक जिवंत पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घरातील वातावरण काही क्षणांतच बदललं.
रुग्णालयात पुन्हा उपचार सुरू
या घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने शीला देवी यांना रुग्णालयात दाखल केलं. आग्रा येथील पार्क रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. शीला देवी उपचारांना प्रतिसाद देतील आणि पुन्हा पूर्णपणे बऱ्या होतील, अशी आशा कुटुंबीयांना होती.मात्र, त्यांची प्रकृती गंभीर राहिली. गेल्या नऊ दिवसांपासून त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. अखेर रविवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे १७ तास मृत समजून अंत्यविधीची तयारी, त्यानंतर अचानक जिवंत असल्याचं समोर येणं आणि पुन्हा नऊ दिवसांनी मृत्यू, या संपूर्ण घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.