सोलापूर-पुणे महामार्गावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; आजोबा-नातवाचा मृत्यू, तिघे जखमी

17 Aug 2026    15 Views    ताज्या बातम्या

लातूरहून रुग्णाला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. केडगाव हद्दीतील व्यंकटेश पेट्रोलपंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला रुग्णवाहिकेने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला असून, रुग्णवाहिकेतील तिघे जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना पहाटेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, देवानंद सुरेश मुधोळकर (वय १७, रा. १२ नंबर पाटी, मांजरा, ता. लातूर) याचा येडशी, धाराशिव येथे अपघात झाला होता. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात येत होते. त्यासाठी एमएच २४ डीडब्ल्यू २६९३ क्रमांकाची रुग्णवाहिका लातूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती.

पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ही रुग्णवाहिका केडगाव गावाच्या हद्दीतील व्यंकटेश पेट्रोलपंपासमोर आली. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच २३ एयू १८१७ क्रमांकाच्या कंटेनरला रुग्णवाहिकेने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रुग्णवाहिकेच्या समोरील भागाचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला.

आजोबा-नातवाचा मृत्यू

या अपघातात रुग्णवाहिकेच्या पुढील बाजूस बसलेले शेटीबा वडजी मुधोळकर (वय ७०) आणि उपचारासाठी पुण्याला नेण्यात येत असलेला देवानंद मुधोळकर यांचा मृत्यू झाला. अपघातामुळे दोघांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, रुग्णवाहिका चालक ओंकार अंतराम कणसे, आशाबाई सुरेश मुधोळकर आणि सचिन सुरेश मुधोळकर हे तिघे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच श्री दत्त ॲम्बुलन्सचे चालक समीर अन्सारी आणि विष्णू राजपूत यांनीही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने यवत येथील रुग्णालयात दाखल केले.

चालक मोबाईलवर व्हिडिओ पाहत असल्याचा आरोप

या अपघातप्रकरणी सचिन मुधोळकर यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत रुग्णवाहिका चालक ओंकार कणसे याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लातूरहून रुग्णवाहिका निघाल्यापासून चालक मोबाईल फोनवर व्हिडिओ पाहत वाहन चालवत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

रुग्णाला त्रास होत असल्याने वाहन सावकाश चालवावे आणि मोबाईल फोनचा वापर करू नये, असे चार ते पाच वेळा सांगूनही चालकाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला रुग्णवाहिकेने धडक दिली आणि या अपघातात आजोबा व नातवाचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी रुग्णवाहिका चालक ओंकार अंतराम कणसे याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, यवत पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक वागज या प्रकरणाचा तपास करीत असून, अपघाताचे नेमके कारण आणि तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.