तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना दणका! शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना FDA ची नोटीस
16 Aug 2026 9 Views ताज्या बातम्यामहाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि त्यांच्या अप्रत्यक्ष जाहिरातींविरोधातील कारवाई आणखी तीव्र केली आहे. आता या कारवाईच्या कक्षेत थेट बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार आले आहेत. अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र FDA कडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला/इलायची’च्या जाहिरातीमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी या तिघांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
FDA ने या तिन्ही कलाकारांना संबंधित जाहिरातीतील सहभाग तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्स, वेबसाइट्स आणि इतर डिजिटल माध्यमांवर या जाहिरातीशी संबंधित असलेला प्रमोशनल मजकूर किंवा सामग्री उपलब्ध असल्यास ती हटवण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये, याबाबत सविस्तर लेखी स्पष्टीकरण 15 दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश नोटिशीत देण्यात आल्याची माहिती आहे.
2024 मधील जाहिरात ठरली चर्चेचा विषय
शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे तिघेही 2024 मध्ये ‘विमल’ ब्रँडच्या जाहिरातीत एकत्र दिसले होते. या जाहिरातीमुळे त्यांचा ‘विमल’ पान मसाला ब्रँडशी संबंध जोडला गेला. FDA च्या मते, जाहिरातीमध्ये उत्पादनाचे नाव, ब्रँडची मांडणी, संवाद आणि सादरीकरण या सर्व बाबींचा विचार करता, ही जाहिरात प्रतिबंधित तंबाखूजन्य उत्पादनाची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिरात ठरते का, हा गंभीर प्रश्न उपस्थित होतो.
FDA ने या प्रकरणाची दखल घेत तिन्ही अभिनेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित जाहिरात ही केवळ ‘इलायची’ किंवा तत्सम उत्पादनाच्या प्रचारापुरती मर्यादित आहे की, त्यामागे प्रतिबंधित पान मसाला उत्पादनाचे अप्रत्यक्ष प्रमोशन केले जात आहे, याची चौकशी करण्यात येत आहे.
FDA च्या नोटिशीत नेमकं काय म्हटलं?
FDA च्या म्हणण्यानुसार, संबंधित जाहिरातीची प्राथमिक तपासणी केली असता त्यामध्ये ‘विमल’ या ब्रँडचा प्रचार होत असल्याचे दिसून येते. हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाला उत्पादनाशी संबंधित असल्याचे FDA ने नमूद केले आहे.
महाराष्ट्राचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 मधील कलम 30(2)(अ) अंतर्गत 13 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या आदेशाचा संदर्भही नोटिशीत देण्यात आला आहे. या आदेशानुसार संबंधित प्रतिबंधित उत्पादनाच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एका वर्षाच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात आली असल्याचे FDA ने स्पष्ट केले आहे.
अशा परिस्थितीत प्रतिबंधित उत्पादनाशी संबंधित ब्रँडची जाहिरात केल्याचा आरोप या तिन्ही कलाकारांवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या जाहिरातीमध्ये त्यांचा सहभाग कायदेशीरदृष्ट्या योग्य होता का, याबाबत FDA ने स्पष्टीकरण मागितले आहे.
कुठे पाठवण्यात आल्या नोटिसा?
FDA कडून बजावण्यात आलेल्या या नोटिसा संबंधित कलाकारांपर्यंत त्यांच्या ठिकाणांवर पाठवण्यात आल्याची माहिती आहे. अजय देवगण यांच्या जुहू येथील निवासस्थानी, शाहरुख खान यांच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ निवासस्थानी, तर टायगर श्रॉफ यांच्या टायगर श्रॉफ प्रॉडक्शन्स LLP या प्रॉडक्शन हाऊसच्या पत्त्यावर नोटीस पाठवण्यात आली आहे.
आता या तिन्ही कलाकारांकडून FDA ला काय उत्तर दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे. 15 दिवसांच्या मुदतीत स्पष्टीकरण सादर केल्यानंतर FDA पुढील कारवाईबाबत निर्णय घेऊ शकते.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका कायम
FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षा आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधातील कारवाईला वेग दिला आहे. भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, रेस्टॉरंटमधील अन्न, शाळांच्या परिसरातील जंक फूड तसेच प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पान मसाल्याचे उत्पादन-विक्री अशा विविध बाबींवर FDA कडून तपासणी आणि छापेमारी सुरू आहे.
राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधातही FDA ने विविध ठिकाणी कारवाई केली आहे. त्यामुळे आता प्रतिबंधित उत्पादनांच्या जाहिराती आणि अप्रत्यक्ष प्रमोशनवरही विभागाने लक्ष केंद्रित केल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार जाहिरातींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे तंबाखू किंवा पान मसाल्याशी संबंधित ब्रँडच्या जाहिरातींमध्ये सेलिब्रिटींचा सहभाग हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील मुद्दा मानला जातो. FDA च्या या कारवाईमुळे सेलिब्रिटी एंडोर्समेंट आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य उत्पादनांच्या अप्रत्यक्ष जाहिरातीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ FDA च्या नोटिशीला काय उत्तर देतात आणि त्यानंतर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.